विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात यांचा सेवागौरव सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न

Spread the news

विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात यांचा सेवागौरव सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न.

­

 

 कोल्हापूर दि 11 :   शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक व प्राचार्य म्हणून 33 वर्षे सेवा बजावणारे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय थोरात यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या धाराशिव, सातारा, इचलकरंजी आणि विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर या शाखांवर  गणित विषयाचे आदर्श शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याचबरोबर अत्यंत कमी वेळेत विवेकानंद कॉलेजच्या विकासात प्रभारी प्राचार्य म्हणून आपला उत्तम प्रशासक म्हणून ठसा उमटविला. आपण सगळेच शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे वारसदार आहोत. त्यांचे तत्त्वज्ञान अंगिकारणारा प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता हा बापूजींचा वारसदार आहे. त्याप्रमाणे बापूजींच्या स्वप्नातील आदर्श गुरुदेव कार्यकर्ते म्हणून प्र.प्राचार्य डॉ.थोरात सरांनी काम केले आहे. .  जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सहनशिलता, विनम्रता, हाडाचे शिक्षक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची जाण, कौटुंबिक सुखदु:खात आधार देणारे आधारवड, शिस्तप्रिय, असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे यांनी केले.  ते प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात  यांच्या  सेवागौरव सदिच्छा समारंभात बोलत होते.   यावेळी विवेकानंद कॉलेजच्या वतीने प्र.प्राचार्य डॉ. संजय थोरात यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, आहेर, श्री महालक्ष्मीची मुर्ती इ. देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.  प्रा.सतीश उपळावीकर यांनी रेखाटलेले त्यांचे व्यक्तीचित्र भेट देण्यात आले.   संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखेसाहेब, संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी प्राचार्य डॉ. थोरात यांना सेवागौरव सदिच्छा समारंभानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

  •  

             सेवागौरव सदिच्छा सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.थोरात यांनी श्री स्वामी‍ विवेकानंद शिक्षण संस्थेमुळे माझी ओळख निर्माण झाली आहे.  मला संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा खंबीर पाठिंबा होता त्यामुळेच शिक्षणक्षेत्रात मुक्तपणे यशस्वी वाटचाल करु शकलो.  माझ्या या प्रवासात शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य  मिळाले आहे.  संस्थेने ज्या ज्या ठिकाणी मला सेवेची संधी दिली त्या शाखांचा परिपूर्ण अभ्यास करुन तेथील शैक्षणिक विकास केला, असे भावनिक उद्गार काढले.

          याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार, थोरात सरांचे बंधू डॉ.धनंजय थोरात, डॉ.एकनाथ आळवेकर, प्रा.वर्षा शिंदे, डॉ.संदीप पाटील, प्रा.सौ.गितांजली साळुंखे, प्रा.सौ.शिल्पा भोसले, डॉ.अनिल जांभळे, श्री.हितेंद्र साळुंखे, प्रा.विश्वंभर कुलकर्णी यांनी मनोगते मांडली.

          कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सी.बी.पाटील यांनी केले तर आभार डॉ.कविता तिवडे यांनी मानले.  सुत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.  मानपत्राचे वाचन प्रा. अविनाश  गायकवाड यांनी केले.  यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ.श्रृती जोशी, स्टाफ सेक्रेटरी डॉ.कविता तिवडे व डॉ.राजश्री पाटील  याचबरोबरच विविध महाविद्यालयातील प्राचार्य,  डॉ. संजय थोरात यांचे कुटुंबीय, रजिस्ट्रार श्री एस के धनवडे, विवेकानंद कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!