शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार
खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे शिक्षण संचालकांना निवेदन
कोल्हापूर दि.१६ : राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी प्राथमिक शाळांचे मार्च महिन्याचे वेतन न झालेल्या शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांचा वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले. महाराष्ट्र मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे व विकास थिटे यांनी आज पुणे येथे शिक्षण संचालक प्राथमिक यांची भेट घेऊन निवेदन दिले.
राज्यातील आरटीई कायदा लागू झाल्यानंतर खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. परंतु अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त होई पर्यंतचे वेतन त्याच शाळेतून ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु यावर्षीच्या संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचारी असलेल्या शाळांची वेतन देयके फॉरवर्ड होत असल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांचे पगार रखडले.
खाजगी प्राथमिक शाळांतील लिपिक संवर्गातील पदे वगळता सर्व शिक्षकांची बिले फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून येत्या आठवड्यात लिपिकांसह वेतन देयके फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र राज्य बंद खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, विकास थिटे व सुजाता मगदूम इत्यादी उपस्थित होते.




