सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध

Spread the news

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध असून राज्य सरकारने जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करण्याचे प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांना जशास तसे उत्तर देवून हा महामार्ग पिटाळून लावू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत दिला.
मोबदल्याची चुकीची आकडेवारी सांगून राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकाबरोबर फळबागा , द्राक्ष , केळी यासारखी पिके घेत असून पिकाखालील बागायती क्षेत्रात मोठी घट होणार असल्याने अनेक ग्रामपंचायतींनी या शक्तीपीठ महामार्गास विरोध केला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातून सांगली , कोल्हापूर , सातारा व कराड याठिकाणी जाण्यासाठी पर्यायी सहा रस्ते उपलब्ध आहेत.
त्याबरोबरच उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग बंद असल्याने पिके वाळू लागली आहेत. वाळू ठेकेदारांशी संगनमत करून वाळू उपसा करण्यासाठी नदीपात्र कोरडे ठेवले जात आहे. यामुळे तातडीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मिळून भीमा नदीपात्रात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे , तानाजी बागल , सचिन शिंदे , अजित बोरकर , काका पाटील , सचिन आडके , यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी व शक्तीपीठ विरोधी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!