सिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे : डॉ.ओमप्रकाश शेट्ये
कणेरी, कोल्हापूर :- ‘परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आय.व्ही.एफ. सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणजे वंधत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे.’ असे मत पंतप्रधान जन आरोग्य योजना ( आयुष्यमान) व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेची एकत्रितपणे अंमलबजावनी करण्याकरीता “आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेट्ये व्यक्त केले. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर संचालित सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला त्यांनी आज सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ.ओमप्रकाश शेट्ये पुढे म्हणाले, “भारतात बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. यावरील उपचार अत्यंत खर्चिक असल्यामुळे सामान्य लोकांना ते परवडणारे नाहीत. अशामुळे अनेक कुटुंब अशी आहेत कि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना असे उपचार घेणे शक्य नाही. अशा पार्श्वभूमीवर सिद्धगिरी आय.व्ही.एफ. सेंटर वरदान ठरत आहे. गत काळाचा आढावा घेतला असता सुमारे ८०० महिला या उपचारामुळे अल्पावधीत मातृत्व सुखास पात्र झाल्या आहेत, हे यशस्वी प्रमाण अतिशय चांगले आहे. आयुर्वेदिक व आधुनिक उपचारांची जोड दिल्यामुळे हे सेंटर मोठा लौकिक प्राप्त करेल.” असे मत त्यांनी व्यक्त केले व शासकीय स्तरावर यासाठी प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. वर्षा पाटील यांनी त्यांना अत्यंत कमी खर्चात हे उपचार कसे शक्य आहे या बद्दल विस्तृत मीमांसा केली. डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी पूर्ण सेंटर व त्यातील सुविधांचा आढावा यावेळी घेतला. या प्रसंगी विवेक सिद्ध, डॉ. सुषमा नाडेकर, डॉ.चिराग गांधी, अनुराधा शिंदे, डॉ.उज्वला माळी, डॉ. आरती माने, पुनीत मुचंडी, प्रसाद नेवरेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.




