प्रा.डॉ.गजानन माळी यांची मायक्रोबायालॉजिस्टस् सोसायटीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Spread the news

प्रा.डॉ.गजानन माळी यांची मायक्रोबायालॉजिस्टस् सोसायटीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड
सांगली – येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या सुक्षजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.गजानन माळी यांची मायक्रोबायालॉजिस्ट सोसायटी, इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी दि. १ जून २०२६ जून पासून निवड करण्यात आली आहे. सोसायटीचे सचिव डॉ.एच.व्ही.देशमुख यांनी डॉ. माळी यांच्या निवडीबाबतचे पत्र नुकतेच दिले आहे.
मायक्रोबायालॉजिस्टस् सोसायटी, इंडियाची स्थापना प्रा.डॉ.अरविंद देशमुख यांनी डॉ. अशोक गुजर यांच्या अध्यक्षतेखाली १९९६ मध्ये कराड येथून अत्यल्प सहकाऱ्यांच्या सोबतीने केली. आज ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून देशविदेशातील सुमारे १४५० आजीवन सदस्य तर २५००० विद्यार्थी सदस्य आहेत. देशभरातील विविध राज्यात प्रादेशिक तसेच विद्यापीठ पातळीवरील सोसायटीचे घटक आहेत. शैक्षणिक संस्था, अध्यापक आणि शास्त्रज्ञांच्या माध्यमातून लोकांमध्ये पोषण आणि चांगल्या जीवनशैलीबाबत जनजागृती करणे या मुख्य उद्धीष्टाने या संस्थेची स्थापना केली असून यात प्रामुख्याने मानवी आरोग्य, रोग नियंत्रण आणि सूक्ष्मजीवांची भूमिका यावर प्रकाश टाकला जातो. इंटरनॅशनल युनियन ऑफ मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीज (IUMS) या जागतिक स्तरावरील मुख्य संस्थेची मायक्रोबायालॉजिस्टस् सोसायटी ही घटक संस्था म्हणून जोडली गेली आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विषयक वैज्ञानिक माहिती सर्वसामान्य विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाते. कोरोनाच्या कालावधीत सोसायटीच्या अनेक स्वयंसेवकांनी अनेक ठिकाणी जनजागृती आणि रुग्णसेवेचे कार्य केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून देशपातळीवर ‘ड्रिंक बटरमिल्क’ अभियानांतर्गत ‘ताक’ या भारतीय पारंपरिक पेयाचे मानवी आरोग्यास असणारे फायद्याबाबत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणात या संस्थेने केले आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य विकास तसेच आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध ऑनलाईन कोर्सेस तज्ञ अध्यापकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय परिषदेचे नियोजन करून आत्तापर्यंत भारत तसेच अमेरिका, मलेशिया, श्रीलंका, भूतान, दुबई, मॉरिशस, बांगलादेश इत्यादी देशातील नामांकित विद्यापीठे आणि संशोधन संस्थेमध्ये परिषदांचे यशस्वी आयोजन केले आहे. अनेक शैक्षणिक संस्थांशी सामंजस करार करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा तसेच इतर शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे कार्य सोसायटीच्या माध्यमातून केले जाते. याशिवाय पी.एचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, जैवविज्ञानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ अधिविभागांना, विद्यार्थ्यांना, अध्यापकाना, संशोधकांना तसेच उद्योजकांना दरवर्षी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित केले जाते. सूक्ष्मजीवशास्त्रातील योगदान ओळखून ज्येष्ठ अध्यापकाना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोसायातीमार्फात सूक्ष्मजीवशास्त्र विषयाची उपयुक्त माहिती दर्शविणारी दिनदर्शिका गेल्या अनेक वर्षापासून प्रकाशित केली जाते. सोसायटीच्या सर्व पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राज्यातील विभागीय तसेच विद्यापीठ पातळीवरील घटक, विद्यार्थी व समाजासाठी कार्यरत आहेत.
विद्यार्थ्याना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या शैक्षणिक जीवनातच संशोधनाला तसेच उद्योजकतेला चालना देण्याचे काम, ग्रामीण भागातील जनतेमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती करून त्यांचे आरोग्य सुधारण्याचे काम तसेच पर्यावरणीय आव्हानांवर उपाय शोधून शाश्वत विकासाठीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील राहील असे मत डॉ. गजानन माळी यांनी व्यक्त केले आहे.

­

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!