छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रयत्नांतून रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन चौथऱ्याचे संवर्धन
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गराज रायगडवरील राजसदर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन चौथऱ्याच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी या कामाची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या. यावेळी पुरातत्त्व विभागाचे संवर्धन अधिकारी राजेश दिवेकर यांनी संभाजीराजे यांना कामाची माहिती दिली.
रायगड विकास प्राधिकरणच्या निधीतून पुरातत्व विभाग या संवर्धनाची कार्यवाही करत आहे. या कामांतर्गत सिंहासन चौथऱ्याचे संवर्धन व ऐतिहासिक सुशोभिकरण केले जात असून मेघडंबरीच्या खाली असणारी महाराजांच्या मूळ सिंहासनाची जागा देखील दर्शनासाठी खुली ठेवली जाणार आहे.
१९८५ साली सिंहासन चौथऱ्यावर मेघडंबरी बसविण्यात आली. २००९ साली छत्रपती संभाजीराजे यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून मेघडंबरी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर या चौथऱ्याचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यात येत आहे. या चौथऱ्याचे व संपूर्ण राजसदरेचं संवर्धन करण्यात यावे यासाठी छत्रपती संभाजीराजे रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून मागील सहा ते सात वर्षे नवी दिल्ली येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयात पाठपुरावा करीत होते.





