छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट व छत्रपती शाहु विद्यालय यांच्या सहयोगाने श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नवीन राजवाडा येथे शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन,
पूर्वसंध्येला सिल्वर बँडचे प्रात्यक्षिके
कोल्हापूर : युगपुरुष श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा राज्याभिषेक दिनाचा शाही सोहळा शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी ७.४५ ते १०.०० या वेळेत नवीन राजवाड्यात दरबार हॉलमध्ये पारंपरिक शाही थाटात साजरा केला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक होणार आहे. सोहळ्यास खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राजपरिवारातील सदस्य, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजातील मान्यवर व शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी शाहिर विशारद आझाद नायकवडी यांचा पोवाडा, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे व्याख्यान, समूह गीत सादरीकरण होणार आहे.
शुक्रवारी सिल्व्हर बँड ऐकण्याची संधी
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून समस्त करवीरकरांसाठी मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण शुक्रवार दि. ५ जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता भवानी मंडप येथे होणार आहे.
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचा मिलिटरी बँड हा भारतीय सैन्यातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित बँडपैकी एक आहे. या बँडने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली आहे. त्यामध्ये राष्ट्रपती भवन, प्रजासत्ताक दिन संचलन, अमर जवान ज्योती, राजस्थान दिवस तसेच गाझा येथे संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन दलासमोरील कार्यक्रमांचा समावेश आहे.
या बँडने १९७९, १९८२ आणि २००१ मध्ये आंतर-रेजिमेंटल आर्मी बँड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १९८१ आणि १९९५ च्या प्रजासत्ताक दिन संचलनादरम्यान भारतीय सैन्यप्रमुखांनी प्रदान केलेली सर्वोत्कृष्ट बँड ट्रॉफी जिंकण्याचा मानही मिळाला आहे.
२००५, २००९ आणि २०१० मध्ये या बँडमधील अनेक वादकांनी अनुक्रमे जपान, रशिया, चिली आणि पॅरिस येथे मार्चिंग, संगीत आणि बँड शो सादर केले.





