*राजर्षी शाहूंचे विचार इंग्रजी भाषेतून व्यापक विश्वापर्यंत पोहोचणार – मुख्यमंत्री डॉ. सावंत*
_डाॅ. जे. के. पवार लिखित “राजर्षी शाहू महाराज: अ कन्साईज बायोग्राफी”चे गोव्यात प्रकाशन_
*कोल्हापूर/गोवा* : प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित “राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र” या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्ती “राजर्षी शाहू महाराज: अ कन्साईज बायोग्राफी” (Rajarshi Shahu Maharaj: A Concise Biography) या पुस्तकाचे प्रकाशन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते गोवा राज्यातील साखळी येथील रवींद्र भवन येथे संपन्न झाले.
पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “डॉ. जे. के. पवार सरांनी मराठी भाषेमध्ये साकारलेले राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र आता इंग्रजीत उपलब्ध झाल्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक व्यापक झाला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, स्त्री-सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, अस्पृश्यता निर्मूलन आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य भारतीय सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा अभ्यास आजच्या काळातही सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरतो. या पार्श्वभूमीवर हा इंग्रजी ग्रंथ देश-विदेशातील विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक आणि नव्या पिढीसाठी महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे.”
प्राचार्य डॉ. जे. के. पवार पुस्तकाविषयी बोलताना म्हणाले, “राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा अभ्यासपूर्ण, सुबोध आणि प्रेरणादायी आढावा यामध्ये घेतला आहे. इतिहास केवळ घटनांचा क्रम नसून तो समाजपरिवर्तनाचा मार्गदर्शक विचार असतो, हे या पुस्तकातून प्रभावीपणे अधोरेखित केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचे, प्रगतीशील धोरणांचे आणि समताधिष्ठित दृष्टिकोनाचे दर्शन या पुस्तकातून वाचकांना घडेल. मराठी मातीतील राजर्षी शाहू विचार इंग्रजी भाषेच्या माध्यमातून व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचविण्यासाठीच या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील तसेच परदेशातील वाचकांनाही राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची ओळख होण्यास मदत होणार आहे.”
या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील जनसंपर्क अधिकारी आणि ई ॲंड टीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी केला असून ते म्हणाले, “मूळ ग्रंथातील आशय, ऐतिहासिक संदर्भ आणि विचारांची ताकद जपण्याचा प्रयत्न केला आहे. गोवा राज्यात या ग्रंथाचे प्रकाशन होणे ही शाहू विचारांच्या प्रदेशसीमांच्या पलीकडे होत असलेल्या प्रसाराची महत्त्वपूर्ण नोंद आहे. राजर्षी शाहू महाराजांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या तरुण पिढीबरोबरच समाजव्यवस्थेसाठीही दिशादर्शक आहेत. त्यामुळे “राजर्षी शाहू महाराज: अ कन्साईज बायोग्राफी” (Rajarshi Shahu Maharaj: A Concise Biography) हा ग्रंथ सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या मूल्यांचा जागर करणारा वैचारिक दस्तऐवज ठरणार आहे.”
कार्यक्रमास सचिवालय, मुंबई येथील अवर सचिव राजकुंवर डफळे-पवार, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील, संचालक प्रा. डॉ. अजय चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रा. डॉ. महादेव कांबळे तसेच आभार प्रदर्शन गोव्यातील बांधकाम व्यावसायिक इंजि. रणधीर पाटील यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*फोटो कॅप्शन* – राजर्षी शाहू महाराज: अ कन्साईज बायोग्राफी (Rajarshi Shahu Maharaj: A Concise Biography) या पुस्तकाचे प्रकाशन करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सोबत लेखक प्राचार्य डॉ. जे. के. पवार, अनुवादक प्रा. डॉ. दिग्विजय पवार, राजकुंवर डफळे-पवार, शिवाजीराव पाटील, प्रा. डॉ. अजय चौगुले, प्रा. डॉ. महादेव कांबळे, इंजि. रणधीर पाटील आदी.



