लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू – सत्यजीत कदम लिंगायत माळी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम उत्साहात

Spread the news

लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू – सत्यजीत कदम
कोल्हापूर : ‘ समाजातील गुणवंत मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप, कर्तबगार व्यक्तींचा सन्मान, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा लिंगायत माळी समाजाने एकोप्याची वीण घट्ट विणली आहे. समाज संघटन करुन लिंगायत माळी समाजाचे सभागृह बांधणीचे काम सुरू केले. हे सभागृह समाजासाठी मोठे व्यासपीठ ठरणार आहे. सभागृहाच्या उभारणीसाठी मोठी मदत करू’अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यजीत कदम यांनी दिली.

­

 

लिंगायत माळी समाज, कोल्हापूर जिल्हातर्फे विविध पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक आदिल फरास, समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब माळी, उद्योजक प्रभाकर कुलगुडे, माजी अध्यक्ष सिताराम बापू चौगुले, उद्योजक गोरख माळी, समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, महिला संघटनेचे अध्यक्ष वंदना माळी, लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजू वाली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. अक्कमहादेवी मंटप येथे आयोजित या समारंभाला समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

  •  

या समारंभात येथील श्रीमती कांता दत्तात्रय माळी यांना आदर्श माता पुरस्कार, निवृत्त प्रा. शंकरराव लक्ष्मण माळी यांना समाज रत्न पुरस्कार तर पट्टणकोडोली येथील सी. एम. माळी यांच्या कुटुंबीयांना आदर्श कुटुंब पुरस्कार देऊन सन्मानित केले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याशिवाय जयसिंगपूर येथील सदाशिव माळी, किणी येथील भिमराव माळी, इस्पुर्ली येथील शंकर सखाराम पाटील, पट्टणकोडोली येथील नंदकुमार माळी, तळदंगे येथील दिनकर माळी, हुपरी येथील शिला गोंधळी, कोल्हापुरातील अरविंद चौगले यांचाही कृतज्ञता सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील अनेक मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.

नगरसेवक आदिल फरास म्हणाले, ‘ लिंगायत माळी समाज हा कष्टाळू वृत्तीचा आहे. कष्ट आणि जिद्दीच्या बळावर विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली. समाजाने शैक्षणिक फंड उभारुन समाजातील गरीब मुलांची शैक्षणिक वाटचाल प्रवाहित केली आहे. समाजाच्या कार्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील.

लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविक केले. समाजातर्फे सांस्कृतिक सभागृह उभारणी करण्यात येणार आहे, सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी प्रत्येक घटकाने मदतीचा हात द्यावा असे आवाहन त्यांनी केले. समाजाचे उपाध्यक्ष अनिल माळी यांनी स्वागत केले. यावेळी कार्याध्यक्ष संतोष माळी, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वैशाली माळी, कार्याध्यक्षा विद्या माळी यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत केले. शिक्षक संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले. आभार वंदना माळी यांनी व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य जी.पी. माळी, निवृत्त पीएसआय शरद माळी, संचालक अशोक माळी, काशिनाथ माळी, किशोर माळी, राजाराम माळी, चंद्रकांत चिपरे, गणपतराव बेलकुड राजेंद्र माळी संजय कोरे, योगेश माळी, राहुल माळी, श्रुती कुलगुडे, घनश्याम माळी, पांडुरंग माळी, नगरसेविका पुनम माळी, साधनाताई माळी,इंदुताई माळी, रूपाली माळी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!