यूकेमधील बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

Spread the news

यूकेमधील बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान
वैभवी चव्हाण यांना मानद डॉक्टरेट :

­

 

कोल्हापूर : यूकेमधील बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे ‘मानव-एआय सहयोग’ या विषयावर प्रभावी संशोधन केल्याने युनायटेड किंगडममधील ‘रेव्हन्सबोर्न युनिव्हर्सिटी लंडन’ येथे प्रकल्प व्यवस्थापन विषयातील वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रमुख संशोधन सल्लागार व कसबा बावड्याची कन्या डॉ. वैभवी विजय चव्हाण यांना अमेरिकेतील डेलावेअर राज्यातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडुस्कोप – प्रोफेशनल अँड सोशल रिसर्च’तर्फे प्रकल्प व्यवस्थापन विषयातील मानद डॉक्टरेट नुकतीच प्रदान करण्यात आली. नवी दिल्ली येथील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ‘फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडुस्कोप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्लोबल क्लायमेट सस्टेनेबिलिटी लीडरशिप समिटमध्ये त्यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे, अन्न, पर्यावरण, वन आणि वन्यजीव मंत्री सरदार मनजिंदर सिंग सिरसा यांच्या उपस्थितीत डॉ. चव्हाण यांना गौरवण्यात आले. यूकेमधील बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करताना त्यातील वर्तणुकीशी संबंधित पैलूंवर त्यांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या संशोधनात एआय-सक्षम प्रकल्प वातावरणातील विश्वास, निर्णयक्षमता, सहयोग, प्रशासन आणि मानवी देखरेख यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच, प्रकल्प-आधारित संस्थांमध्ये जबाबदार पद्धतीने एआयचा समावेश करण्याबाबतच्या ज्ञानसाठ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. चव्हाण यांची सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचा प्रभाव आणि प्रकल्प व्यवस्थापन शिक्षण व नवोपक्रमांमधील योगदान यांची दखल घेऊन, ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडुस्कोप’च्या समन्वयक सुश्री माया मेधा यांनी जानेवारी २०२६ मध्ये या प्रतिष्ठित सन्मानासाठी त्यांचे नामांकन सादर केले होते. डॉ. चव्हाण यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरावील सन्मानाने कोल्हापुरच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला आहे.

  •  

चौकट : वैभवी चव्हाण अनेक पुरस्करांचा मानकरी
डॉ. चव्हाण यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत; यामध्ये ‘PMI Future 50 Honoree 2024’, ‘IPMA GeCCo Global eCollaboration Competition Top 3 Winner 2025’, ‘PMXPO PM Passport Top Winner 2025’, ‘Distinguished Indian Women Achiever Award 2026’ आणि ‘Most Promising Researcher Award 2026’ यांसारख्या अनेक पुरस्कारांचा व सन्मानांचा समावेश आहे.

कोट: हा सन्मान मी माझे वडील ॲड विजय शामराव चव्हाण व आई विभावरी चव्हाण यांना समर्पित करते. माझ्यावरील त्यांचा विश्वास, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा बिनशर्त पाठिंबा हाच माझ्या आयुष्यातील प्रत्येक यशाचा पाया राहिला आहे. त्यांची मूल्ये, जिद्द आणि प्रोत्साहन यांनी मला शिक्षण, संशोधन आणि सेवा या क्षेत्रांत उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा दिली.
-डॉ. वैभवी चव्हाण, संशोधक

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!