गोकुळ निवडणूक- शिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा

Spread the news

*गोकुळ निवडणूक- शिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा*
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. सोमवारी महायुतीतील आघाडीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने ठराव धारकांचा मेळावा घेऊन तब्बल १४३० ठराव सहाय्यक निबंधकांकडे सादर केले होते. या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक आणि गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी अजूनही जिल्ह्यातील बऱ्याच दूध संस्था भाजप महायुती सोबत येणार असल्याचे सुतोवाच केले होते याचाच प्रत्यय आज आला. शिरोळ तालुक्यातील तब्बल २५ दूध संस्था प्रतिनिधींनी आपले ठराव भारतीय जनता पक्षाकडे सुपूर्द केले. माजी आमदार महादेवरावजी महाडिक आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी केलेल्या पारदर्शी कारभारामुळे हे ठराव सुपूर्द करत असल्याचे सांगत शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांनी कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक विजयेन्द्र माने यांच्याकडे हे ठराव सुपूर्द केले.
तत्पूर्वी शितल गतारे यांच्या नेतृत्वाखाली ठरावधारकांनी राजाराम कारखाना येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन शिरोळ तालुक्यातील बहुतांश दूध संस्था भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असल्याचे अभिवचन दिले.
या ठरावांमुळे भारतीय जनता पक्षाच्या ठरावांची संख्या १४५५ इतकी झाली असून या संख्येत आणखी वाढ होण्याचा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!