मोलकरीण, शेतमजूर , परिचारिका चळवळीच्या नेत्या कॉ. सुशीला यादव यांचे निधन

Spread the news

मोलकरीण, शेतमजूर , परिचारिका चळवळीच्या नेत्या कॉ. सुशीला यादव यांचे निधन
कोल्हापूर : मोलकरीण, शेतमजूर व परिचारिका संघटनांच्या लढाऊ नेत्या कॉम्रेड सुशीला बाबासाहेब यादव (वय ७८) यांचे बुधवारी (१ जुलै) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने असंघटित कामगार चळवळीची मोठी हानी झाली आहे.
१८ जून १९५५ रोजी जन्मलेल्या सुशीला यादव यांनी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. २००४ मध्ये कोल्हापुरात राज्यातील पहिली घरेलू कामगार (मोलकरीण) संघटना उभारण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मोलकरणींना किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, कल्याण मंडळ आणि कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे, आंदोलने आणि राज्यव्यापी लढे उभारले.
मोलकरणींसह शेतमजूर व परिचारिका संघटनांच्या माध्यमातून हजारो महिलांना संघटित करून त्यांच्यात आत्मसन्मान व हक्कांची जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे संस्थापक मिलिंद यादव यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती कॉ. बाबासाहेब यादव, मुलगा मिलिंद, मुलगी मनीषा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार बुधवारी शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले. बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!