नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकाची भूमिका सुलभकाची : डॉ.कमलादेवी आवटे
कोल्हापूर । प्रतिनिधी दि.०४ : ” राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील बदललेल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची असून विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनाला प्रेरणा देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण, क्षमताधिष्ठीत सर्वांगीण विकास साध्य करावा असे, प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( एस.सी.आर.टी.) सहसंचालिका डॉ.कमलादेवी आवटे यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता तिसरी व चौथीच्या नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून सध्या इयत्ता दुसरी, तिसरी व सहावी या वर्गांसाठी नवीन पाठ्यपुस्तकांची अभ्यासक्रमाची निर्मिती केली असून त्याचे प्रशिक्षण राज्य जिल्हा व तालुका स्तरावर सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या उपसंचालिका वर्षाराणी भोपळे यांनी यावेळी बोलताना, ” शिक्षकांनी नवीन अभ्यासक्रमातील वैशिष्ट्ये समजावून घेऊन आपल्या अध्यापनात आवश्यक तो बदल करावा तसेच शिक्षकांनी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करावा ” असे आवाहन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना केले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भोई यांनी, कोल्हापूर जिल्ह्याने नास, परख व पीजीआय मध्ये राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जिल्ह्याने आपली गुणवत्ता सिद्ध केल्याचे आपल्या प्रस्ताविकातून स्पष्ट केले. कोमनपा शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वि. स. खांडेकर विद्यालय येथे प्रशिक्षण वर्ग सुरु आहे.
प्रशिक्षण समन्वयक श्रावण कोकितकर यांनी उपस्थितांचे स्वागत पुस्तके देऊन केले. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता वृषाली गायकवाड, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, प्रशिक्षण मार्गदर्शक सारिका पाटील, विजय सुतार, संध्या कोरे, मृणाल गावडे, विनोद गायकवाड, अमित पोटकुले, संभाजी नलवडे,लहू राठोड, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जी कीर्तिकर यांनी केले तर विश्वास केसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.




