आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; SSPE बाधित रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्रीांकडे तात्काळ निधी वितरित करण्याची मागणी 

Spread the news

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; SSPE बाधित रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्रीांकडे तात्काळ निधी वितरित करण्याची मागणी
मुंबई : SSPE (Subacute Sclerosing Panencephalitis) या दुर्मिळ व गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत मंजूर झालेली आर्थिक मदत वेळेत मिळावी, यासाठी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ पुढील निधी वितरित करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, SSPE ग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून दरमहा ₹25,000 इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांच्या उपचारांना मोठा आधार मिळाला असून त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी सातत्याने मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने मंजूर झालेला पुढील निधी तातडीने वितरित होणे अत्यंत आवश्यक आहे.
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत मुख्यमंत्री महोदयांकडे यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करत, निधी वितरणात होणारा विलंब थांबवून तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या निवेदनाची मुख्यमंत्री सचिवालयानेही दखल घेत आवश्यक कार्यवाहीसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
याबाबत आरोग्यदूत मंगेश चिवटे म्हणाले, “SSPE सारख्या दुर्मिळ आणि गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी आर्थिक मदत ही जीवनदायी ठरते. उपचार निधीच्या अभावी कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, हीच आमची भूमिका असून शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.”
SSPE ग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी आरोग्यदूत मंगेश चिवटे सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत असून, रुग्णांना वेळेत मदत मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न कायम सुरू आहेत.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!