एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (AISSMS IOIT), पुणे येथे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “करिअर मार्गदर्शन, अभियांत्रिकी प्रवेश पर्याय अर्ज (Option Form) भरणे व उपलब्ध शिष्यवृत्ती” या विषयावर मुक्त मार्गदर्शन सत्राचे आयोजन.
संस्थेच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे येथे दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता “करिअर मार्गदर्शन, अभियांत्रिकी प्रवेश पर्याय अर्ज (Option Form) भरणे व उपलब्ध शिष्यवृत्ती” या विषयावर मुक्त मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून आयोजित करण्यात आले. या सत्रासाठी करिअर मार्गदर्शक श्री. केदार टाकळकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे, आवश्यक कागदपत्रे, महाविद्यालय व शाखा निवडीसाठी पर्याय अर्ज (Option Form) भरण्याची पद्धत, CAP फेरी १, २ व ३, संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया, सीट मॅट्रिक्स तसेच जागावाटप (Seat Allotment) याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी संस्थेअंतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयांची माहिती देत विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांविषयीही सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून एमएचटी-सीईटी परीक्षा पूर्ण होईपर्यंत अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या MHT-CET Mock Test 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्राच्या शेवटी विद्यार्थी व पालकांसोबत संवादात्मक प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रवेश प्रक्रिया, पर्याय अर्ज भरणे, शिष्यवृत्ती योजना तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी यासंबंधीच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हे सत्र अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरले.
हा कार्यक्रम संस्थेचे माननीय सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने तसेच विभागप्रमुख डॉ. एम. पी. गजरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन प्रवेश समितीचे प्रभारी डॉ. पी. जी. मुस्रीफ यांनी केले.




