Spread the news

भारत – पोलंड : मानवता, संघर्ष आणि चिरंतन मैत्रीचे अद्वितीय पर्व
दि. ८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाचा ऐतिहासिक दौरा
८ ऑगस्ट रोजी पोलंड देशाचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, भारत – पोलंड संबंधांच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी व सोव्हिएत युनियनने पोलंड देशावर आक्रमण केल्यानंतर लाखो पोलिश नागरिकांना निर्वासित व्हावे लागले होते. या काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने १९४२ ते १९४८ या काळात जवळपास ५,००० पोलिश निर्वासितांना कोल्हापूरजवळील वळीवडे येथे आश्रय दिला होता.
छत्रपती घराण्याच्या आश्रयाखाली आणि कोल्हापूरकरांच्या आत्मीय सहकार्यामुळे या निर्वासितांनी सन्मानाने नवजीवन उभारले. वळीवडे येथे शाळा, चर्च, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगणे आणि सामाजिक संस्था उभ्या राहिल्या. पोलिश संस्कृती जपत भारताशी निर्माण झालेली मैत्री पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहिली.
युरोपमध्ये परतल्यानंतरही अनेक पोलिश नागरिकांनी कोल्हापूरला आपले दुसरे घर मानले. या ऐतिहासिक वारशाच्या स्मरणार्थ १९९८ मध्ये वस्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आणि २०१९ साली संभाजीराजे छत्रपती यांच्या वतीने ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सन २०१९ मध्ये महाराष्ट्र शासन आणि पोलंड सरकार यांनी संयुक्तपणे वळीवडे येथे “म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस” उभारण्याची घोषणा केली. कोविड-१९ महामारी आणि कोल्हापूरमधील पुरामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत विलंब झाला असला तरी, युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा उपक्रम पुढे सरकत राहिला.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी वळीवडेच्या वारशाच्या माध्यमातून भारत – पोलंड संबंधांना नवसंजीवनी देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. युवराज्ञी संयोगिताराजे यांनी संग्रहालयासाठी मूळ बॅरेक्सचा ऐतिहासिक पाया शोधून त्याचे संवर्धन करण्यासाठी विशेष योगदान दिले.
भारताच्या माजी राजदूत नगमा मलिक, विद्यमान राजदूत नीता भूषण, पोलंडचे भारतातील माजी राजदूत अॅडम बुराकोव्स्की, विद्यमान राजदूत पिओत्र अँटोनी श्विताल्स्की, तसेच मालगोर्झाता वेजिसिस-गोवेंबियाक (पोलिश इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली) आणि टोमाझ व्हिलगोमास (मुंबई येथील पोलंडचे वाणिज्यदूत) यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यादरम्यान राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला अभिवादन करून छत्रपती घराणे आणि कोल्हापूरच्या जनतेच्या मानवतावादी कार्याचा गौरव केला.
याच पार्श्वभूमीवर, दि. ८ ऑगस्ट रोजी पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाचा कोल्हापूर दौरा होत असून, या वर्षाअखेरीस होणाऱ्या पोलंडच्या पंतप्रधानांच्या संभाव्य कोल्हापूर भेटीच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
शिष्टमंडळातील मान्यवर
•सुश्री किंगा गायेव्स्का – पोलंड संसद (सेजम) सदस्य व पोलंड–भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा.
•डॉ. (मा.) अमित लाथ – उपाध्यक्ष, युरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स; प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते.
•श्री. टोमाझ झ्यावियोनी – अध्यक्ष, रिजनल चेंबर ऑफ कॉमर्स, कॅटोव्हिस; उपाध्यक्ष, युरोपियन फेडरेशन ऑफ एंटरप्रेन्योर्स; स्लोव्हेनिया प्रजासत्ताकाचे मानद वाणिज्यदूत.
•सुश्री क्रिनल शाह सूरी – संचालक, ग्लोबल अफेअर्स अँड बिझनेस; उपाध्यक्षा, साउथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री; संचालक मंडळ सदस्य, युनायटेड नेशन्स असोसिएशन, पोलंड.
•सुश्री अलेक्सांद्रा ऑस्मान्स्का – संसदीय कार्य संचालक, किंगा गायेव्स्का कार्यालय.
•सुश्री कॅरोलिना व्हुईचिका – आंतरराष्ट्रीय वार्ताहर, Dziennik Gazeta Prawna, पोलंडमधील अग्रगण्य दैनिक.
हे शिष्टमंडळ वळीवडे येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासितांना दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक स्मारकाला अभिवादन करणार असून, प्रस्तावित म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस प्रकल्पाची पाहणी करणार आहे.
महाराष्ट्र शासनाने यापूर्वी संग्रहालयाच्या इमारतीसाठी सुमारे ₹१.५ कोटी खर्च केला असून, जागतिक दर्जाचे म्युझियम विकसित करण्यासाठी ₹५.५ कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात या प्रकल्पाला युनेस्कोच्या मान्यतेसाठी प्रस्तावित करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
पोलंडच्या पंतप्रधानांची यावर्षी अपेक्षित कोल्हापूर भेट भारत – पोलंड संबंधांच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना ठरणार असून, कोल्हापूरला जागतिक स्तरावर मानवता, करुणा आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचे प्रतीक म्हणून अधिक प्रतिष्ठा मिळवून देईल.
कोल्हापूरची जनता या मान्यवर शिष्टमंडळाचे मनःपूर्वक स्वागत करत असून, आठ दशकांहून अधिक काळ टिकून असलेल्या भारत – पोलंड मैत्रीला अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!