संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-IX बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
अतिग्रे : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे सीबीएसई क्लस्टर-IX बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२६-२७ या प्रतिष्ठेच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता एसजीआय स्टेडियम, अतिग्रे येथे होणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास जयसिंगपूरचे डीवायएसपी श्री. अमोल ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सीबीएसई क्लस्टर-IX अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातील सीबीएसई शाळांमधील प्रतिभावान बास्केटबॉलपटू सहभागी होणार असून, खेळाडूंना आपले कौशल्य, संघभावना, शिस्त आणि क्रीडावृत्ती दाखविण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत 42 शाळांमधील 1000 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. सदर स्पर्धा 14, 17 व 19 या वयोगटातील मुले व मुली या पद्धतीने होतील. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संघभावना विकसित होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलकडून सातत्याने विविध आंतरशालेय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून सीबीएसई क्लस्टर-IX बास्केटबॉल चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. असे पत्रकार परिषदेवेळी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉ एच.एम नवीन, डेबोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर शाळेतील क्रीडा विभाग, शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी परिश्रम घेत असून, स्पर्धा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे पत्रकार परिषदेवर सांगण्यात आले.



