नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जागेचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

Spread the news

*नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जागेचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर*

­

 

*आमदार चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद; राज्यमंत्री (गृह) योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक*

  •  

मुंबई, दि. १८ ऑगस्ट २०२६ : करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ५० एकर जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यमंत्री (गृह) योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे गायरान गट क्रमांक ६३ संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत तीर्थक्षेत्र विकास, रिंगण सोहळा आणि भाविकांच्या सुविधांसाठी गावालगतची जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

नंदवाळच्या रिंगण सोहळ्यासह तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेली गायरान गट क्रमांक ६३ मधील सुमारे ४६ हेक्टर जमीन २३ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार भारत राखीव बटालियन क्रमांक ३ व राज्य राखीव पोलीस दलासाठी राखीव करण्यात आली होती. या निर्णयाला ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत विविध आंदोलने केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १९ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सुमारे ५० एकर जागा गावासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याच प्रश्नाचा आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यापासून ते विविध मंत्रालयीन बैठका आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधण्यापर्यंत त्यांनी हा विषय लावून धरला. त्याचाच परिणाम म्हणून आता मंत्रालयातील बैठकीत या प्रश्नावर पुढील कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.

बैठकीत गट क्रमांक ६३ मधील गावालगतची सपाट जागा तीर्थक्षेत्र विकास तसेच ग्रामस्थांच्या वापरासाठी राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले. वनसदृश्य जमिनीबाबत आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर विकास आराखडा (DPR) तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी व संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजणी करून आवश्यक अहवाल तातडीने सादर करावा आणि पुढील कार्यवाहीला गती द्यावी, असेही निर्देश देण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नंदवाळच्या या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासनस्तरावर आता ठोस आणि निर्णायक पावले पडत आहेत.

नंदवाळचा हा प्रश्न केवळ जमिनीचा नसून लाखो वारकरी भाविकांची श्रद्धा, रिंगण सोहळ्याची परंपरा आणि तीर्थक्षेत्राच्या भविष्यातील विकासाशी जोडलेला आहे. त्यामुळे या जागेचा प्रश्न मार्गी लागल्यास भक्तनिवास, पार्किंग, व्यापारी संकुल, बाग-बगीचा आणि इतर आवश्यक सुविधांच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता सकारात्मक दिशा मिळाली असून, नंदवाळ तीर्थक्षेत्र विकासाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.

या बैठकीस अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सोमनाथ घार्गे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड (ऑनलाईन), महसूल विभागाच्या उपसचिव गौरी मस्के, जितेंद्र मिसाळ (D.Y.S.P.), करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्नील पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. ए. सुतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!