*रस्ता की मृत्यूचा सापळा? लक्षतीर्थमध्ये अपघातांची मालिका, प्रशासन मात्र सुस्त!*
*अरुंद रस्ता, तीव्र उतार आणि संरक्षक कठड्यांचा अभाव; महिनाभरात टेम्पो व ट्रक शेतात उलटले, मोठ्या दुर्घटनेची भीती*
*कोल्हापूर* : लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या वाहनधारकांच्या जीवाशी खेळणारा ठरत असून, अपघातांची मालिका सुरू असतानाही प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ता, दोन्ही बाजूंना शेती, तीव्र उतार, रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे नसणे आणि वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ यामुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.
मागील महिनाभरात रस्त्याचा कडेला असलेला भाग खचल्याने एक छोटा टेम्पो आणि एक ट्रक पलीकडील शेतात उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली नसली तरी, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की, एकावेळी दोन चारचाकी वाहने समोरासमोरून जाणेही कठीण होत आहे. रस्त्याची रुंदी अपुरी असतानाच दोन्ही बाजूंना तीव्र उतार आहे. त्यामुळे एखाद्या वाहनधारकाचा थोडासा तोल गेला किंवा समोरून आलेल्या वाहनाला वाट देताना वाहन रस्त्याच्या कडेला गेले, तर थेट शेताच्या बाजूला असलेल्या चरीत कोसळण्याचा धोका आहे.
विशेष म्हणजे, रस्त्याच्या धोकादायक कडेला कोणतेही संरक्षक कठडे, सुरक्षा भिंत किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी धोका आणखी वाढतो. अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ पाहता रस्त्याची सद्यस्थिती गंभीर बनली आहे.
एका बाजूला रस्त्याची अपुरी रुंदी, दुसऱ्या बाजूला खचणारा कड आणि त्याला लागून असलेला तीव्र उतार, अशी परिस्थिती असताना प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
*जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?*
मागील महिन्यात दोन वाहने शेतात उलटण्याच्या घटना घडूनही संबंधित यंत्रणांनी अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. भविष्यात एखाद्या वाहनाला मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून रस्त्याची डागडुजी व मजबुतीकरण करावे. धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे उभारावेत, रस्त्याची आवश्यक त्या ठिकाणी रुंदी वाढवावी तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
*दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करा!*
लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणारा हा मार्ग दररोज अनेक नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदी पाहणी किंवा आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. रस्त्याची धोकादायक स्थिती कायम राहिल्यास भविष्यात एखाद्या मोठ्या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार राहील, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
– *डॉ. ऋषिकेश जाधव, अध्यक्ष, संवेदना फाउंडेशन, कोल्हापूर*



