व्हायरल ऑडिओ क्लिप व इतर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून रविकिरण इंगवले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी; शिवसेना महापालिका गटाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Spread the news

व्हायरल ऑडिओ क्लिप व इतर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून रविकिरण इंगवले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी; शिवसेना महापालिका गटाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

­

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून त्यातील वक्तव्यांच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी, तसेच रविकिरण इंगवले यांच्याविरोधातील विविध तक्रारी व दाखल प्रकरणांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका शिवसेना गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

  •  

शरद कोराणे यांच्या मृत्यूबाबत कथित कबुली दिल्याचा दावा असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील आवाज रविकिरण इंगवले यांचा असल्याचा दावा करण्यात येत असून, या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक व सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी शिवसेना महापालिका गटाने केली आहे.

याशिवाय, चार दिवसांपूर्वी शहरातील एका तरुणाने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रविकिरण इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा नोंद झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित तरुणाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा तसेच त्याच्या पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचीही सखोल चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच शहरातील बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित प्रकरण, शिवाजी पेठेतील नागरिकाला मारहाण केल्याच्या आरोपासह खंडणी, जागा बळकावणे, महिलांशी गैरवर्तन व मारहाणीच्या इतर तक्रारींची चौकशी करावी, अशीही मागणी शिवसेना महापालिका गटाने केली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून त्यातील संवादाच्या अनुषंगाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच दाखल गुन्हे व इतर तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, नगरसेविका सौ. मंगल साळोखे, नगरसेवक अजय इंगवले, स्वरूप कदम, वैभव माने, तात्या खेडकर, नेपोलीयन सोनुले, करण जाधव आणि अशपाक आजरेकर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!