*पीएमई बस सेवा अंतर्गत नवीन बसची प्रत्यक्ष रस्ता चाचणी (Trial Run) यशस्वीपणे संपन्न*
कोल्हापूर शहर वाहतूक व परिवहन व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार ‘पीएमई बस सेवा’ (PME Bus Service) अंतर्गत प्राप्त झालेल्या ४० नवीन बेसेस मधिल दोन बसची आज, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष रस्ता चाचणी (Trial Run) यशस्वीपणे पार पडली.
या चाचणीदरम्यान शहरातील विविध प्रमुख व अंतर्गत मार्गांवर बसच्या प्रत्यक्ष संचालनाची पाहणी करण्यात आली:
१२ मीटर बस चाचणी आर. के. नगर येथील स्वयंभू गणेश मंदिर ते कसबा बावडा या मार्गावर घेण्यात आली तसेच
९ मीटर बस चाचणी बोंद्रे नगर ते एसटी स्टँड – शाहू मैदान – राजारामपुरी – गंगावेश या मुख्य व अंतर्गत मार्गावर यशस्वी पार पडली.
प्रत्यक्ष वाहतूक संचालनादरम्यान शहरातील ट्रॅफिक सिग्नल्स, वाहतुकीची संभाव्य कोंडी, विविध बस थांब्यांवरील प्रवाशांचे चढणे-उतरणे, तसेच रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्समुळे होणारे परिणाम या सर्व तांत्रिक व व्यावहारिक बाबींचा सखोल अभ्यास आणि मूल्यमापन करण्यात आले.
सदर चाचणीच्या वेळी परिवहन सभापती श्री. सत्यजित जाधव आणि अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक श्री. संजय भोसले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. त्यांनी बसमधून प्रवास करत वाहतूक संचालनाची सविस्तर पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.
शहर दाखल झालेल्या या अत्याधुनिक व वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमुळे कोल्हापूरकर प्रवाशांमध्ये या बस सेवेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आजची चाचणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, लवकरच होणाऱ्या अधिकृत उद्घाटनानंतर ही बस सेवा सर्व सामान्य कोल्हापूरकर प्रवासी नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या वेळी सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, जेबीएम प्रतिनिधी सचिन साळुंखे, हंसा ऋषिकेश शिंदे, परिवहन विभाग चे चालक रविंद्र बोड़के नितीन ढेरे उपस्थित होते.



