प्रति,
मा. मुख्य अभियंतासो,
जलसंपदा विभाग, कोल्हापूर
विषय – नेपाळ मधील महाप्रलयाची पुनरावृत्ती काळम्मावाडी धरण येथे न ओढवण्याबाबत…
महोदय,
कोल्हापूरच्या जलवाहिनीचे हृदय असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीच्या नावाखाली धरणाला तडे देण्याचे काम शिवा स्ट्रक्चर्स प्रा. लि. संभाजीनगर या कंपनीकडून चालू आहे. दुरुस्तीच्या नावाखाली धरणाच्या भिंतींना हायड्रोलिक ब्रेकर द्वारे कोअर कटिंगच्या नावाखाली हाय प्रेशरने भोके मारली जात आहेत. ज्यामुळे व्हायब्रेशन होऊन धरणाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात इजा पोहचत असून नेपाळच्या महाप्रलयाची पुनरावृत्ती दूधगंगा धरण काळम्मावाडी येथे घडण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच आपण सत्वर निर्णय घ्यावा. अन्यथा आपल्या विरोधात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
१०० वर्षापूर्वी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले राधानगरी धरण आजही सुस्थितीत असून स्थापत्य इंजिनिअरिंगचा सर्वोत्कृष्ट जागतिक दर्जा प्राप्त या धरणाचे सर्व दरवाजे १०० वर्षानंतरही कोणत्याही अडथळ्याविना स्वयंचलित पद्धतीने आजही उघडले जात आहेत. मात्र २५ वर्षापूर्वी सुरू झालेल्या काळम्मावाडी धरणाच्या बांधकामास जवळपास ४०० कोटी रुपये खर्च झाला तेवढाच पैसा धरणाच्या गळतीवरती आजवर करण्यात आलेला असून यामध्ये अधिकारी व ठेकेदारांची पैशासाठी असणारी अभद्र मिलीभगत कोल्हापूरच्या जलवाहिनीच्या मुळावर उठलेली आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक दोन राज्यातील आंतरराज्य प्रकल्प असलेल्या दूधगंगा धरणाच्या प्रकल्पाचे बांधकाम प्रत्यक्षात १९७६ ला सुरू होऊन सन १९९९ ला पूर्णत्वास नेण्यात आले. मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरून प्रारंभ झाल्यानंतर एक वर्षातच म्हणजे दिनांक १८/१२/२००० रोजी धरणाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना करून मार्च २००३ मध्ये प्रत्यक्ष लेखी अहवाल या समितीने सादर केला.
या अहवालाच्या आधारे दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी ७४ लाखांची मंजूर निविदा असताना ती २० ते २५ टक्के जादा दराने श्रीनिवास कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर यांनाच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने प्राप्त होते.
या उपर भ्रष्टाचाराचा कळस म्हणून की काय ७४ लाखांचे मंजूर टेंडरमध्ये अधिकारी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीने कागदोपत्री घोडे नाचवून ७४ लाखांच्या टेंडरमध्ये अधिकची वाढ करून ते ६ कोटी ९० लाख ६२ हजार रुपयांच्या रकमेपर्यंत पोहोचवून श्रीनिवास कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर यांना बिले अदा करण्याचा महाप्रताप कोल्हापूर जलसंपदा विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेला आहे.
इतकी कोट्यावधींची बिले अदा करून सुद्धा २०१६ पर्यंत केवळ ७७% गळती थांबली असे कागदोपत्री खोटे भासवून श्रीनिवास कन्स्ट्रक्शनवर कोट्यावधींची खैरात जलसंपदा विभागाने केलेली आहे. ती ताबडतोब वसूल करण्यात यावी.
तसेच आजवर ६ कोटी ९० लाख ६६ हजार रुपये खर्च करून २०१६ पर्यंत ७७% गळती कागदोपत्री थांबली असताना उर्वरित ३३% गळती (कागदोपत्री) साठी ९२ कोटींची जाहिरात शिवा स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनीला देऊन भ्रष्टाचाराने जनतेच्या पैशाची लूट चालू आहे.
शिवगंगा धरण हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून महाराष्ट्र व कर्नाटक यांनी संयुक्तरीत्या या धरणाच्या पाण्यावरती हक्क सांगितलेला आहे. धरणाच्या पुढे अजून उजवा व डावा कालवा असे दोन प्रवाहित असून त्यापैकी उजव्या कालव्याचे १०० टक्के काम पूर्ण झालेले असल्याने उजव्या कालव्यातून पाणी थेट कर्नाटकला विना अडथळा जात आहे. मात्र आमच्या महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या वाट्याला येणार पाणी जे डाव्या कालव्यातून येतो त्याचे काम अद्यापही रखडलेल्या अवस्थेत अपूर्ण आहे.
त्यात अपूर्ण अवस्थेतील डाव्या कालव्यातून महाराष्ट्राला पर्यायाने कोल्हापूरच्या जनतेला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही.
“जमीन आमची, पाणी आमचं, हक्क आमचा, खर्च आमचा, धोका आमच्या लोकांना आणि पाणी पळवतंय कर्नाटक शासन” इतकी उदासीनता महाराष्ट्र शासनाची जे कर्नाटक पुढे सपशेल लोटांगण घालतोय. महाराष्ट्र जलसंपदा विभागाची इतकी हतबलता का याचे उत्तर आपण दिले पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला तेही आजच…!
४९ वर्षानंतरही कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे पाणी वाहून नेण्यासाठी डावा कालवा आजही जाणीवपूर्वक रखडवला जातोय. त्यासाठी असणारी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा कमी पडत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजपासून या आंदोलनाला प्रारंभ केलेला आहे. हे अत्यंत वाईट असून ताबडतोब डाव्या कालव्याचे काम पूर्णत्वास न्यावे अन्यथा आपल्या विरोधात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
महाराष्ट्राच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या कर्नाटकची आडमुठी भूमिका कोल्हापूरच्या मुळावर उठतेय. एकीकडे अलमट्टी धरणाची उंची वाढवून मागे पाण्याच्या फुगवट्याने महाराष्ट्राची वाट लागली तरी चालेल पण पाणी अडवणारच ही आडमुठी भूमिका, मात्र दुसरीकडे आम्ही अडवलेलं काळम्मावाडीचे पाणी शंभर टक्के पूर्ण असणाऱ्या उजव्या कालव्यातून थेट कर्नाटकला घेऊन जायचं अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या कर्नाटक शासनाला सडेतोड उत्तर देऊन आलमट्टी धरणाची उंची वाढवली तर काळम्मावाडीचे पाणी बंद करण्याची भूमिका घेण्याची गरज सध्या जलसंपदा विभागाला निर्माण झालेली आहे.
लोक भावना व जनहिताचा आदर राखून अशा पद्धतीचा ठराव आपण त्वरित करून तो शासनास मंजूर करण्यासाठी भाग पाडावा.
गेली २७ वर्ष कोट्यावधी रुपयांचा खर्च करून सुद्धा धरणाची गळती थांबलेली नाही. मात्र सद्यस्थितीला शिवा स्ट्रक्चर्स प्रा. लि., संभाजीनगर या कंपनीने कोट्यावधींचा ठेका घेऊन सुद्धा साफसफाई देखभाल दुरुस्तीची २७ कोटी रुपयांची बिले आजवर उचललेली असून अद्यापही धरणाच्या वरील बाजूस मध्यभागी असणारी वडाची झाडे काढलेली नाहीत जी अतिशय गंभीर बाब आहे.
धरणाच्या सांडव्यावरती वाढलेले गवत, झाडे-झुडपे, खुरटे जे आजही धरणाच्या भिंतीला धोकादायक आहेत. मात्र त्याची बिले अदा करून सुद्धा साफसफाई देखभाल दुरुस्ती शिवा स्ट्रक्चर्स या कंपनीने केलेली नाहीत. यासाठी या कंपनीला त्वरित ब्लॅकलिस्ट करावे.
धरणाची गळती काढण्याच्या नावाखाली धरणाच्या माथ्यावर कोअर कटिंगची भोके अवजड मशीनरीद्वारे मारली जात असल्याने काळम्मावाडी धरणाच्या काही भागाला तडे गेलेले आहेत. धरणाच्या सांडव्यावरून गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. याबाबतचे व्हिडिओ पुरावे देखील सोबत जोडीत आहे.
काळम्मावाडी धरण बांधताना केवळ १०-१२ गावे, वाड्या-वस्त्यांचे पुनर्वसन केले होते. मात्र सद्यस्थितीला हे धरण फुटले तर शेकडो गावे पाण्याखाली येतील. लाखो माणसं, हजारो जनावरं दगावतील. लाखो हेक्टर शेती, पिकं जमीनदोस्त होतील. आयुष्यभर एक एक पिढी बघून केवळ दगड-विटांनी नव्हे तर घामाच्या थेंबांनी व भावनांच्या धाग्यांनी गुंफून बांधलेली घरं पडतील, कित्येक मुले अनाथ होतील, कित्येक आई-बाबांची मुलं त्यांच्यापासून हिरावून घेतली जातील, काही आयुष्यभराचे अपंगत्व भोगतील, अनेक चिमुकल्यांना जग बघायच्या अगोदरच स्वतःच्या प्राण्यांना मुकावे लागेल, कित्येक संसार उध्वस्त होतील, कित्येक बेघर होतील, हजारो वाहने पुरात वाहून जातील, रोगराई पसरेल, मृत्यूचं तांडव पाहायला मिळेल, मृतदेहांचा डोंगर रचला जाईल.
हे भयान वास्तव कोल्हापुरात घडण्याची दाट शक्यता आहे. केवळ भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळे होणाऱ्या जीवितहानीस कार्यालय प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदार असाल व अशा परिस्थितीत अगोदर सूचना देऊन सुद्धा आपण दुर्घटना टाळली नाही व नेपाळच्या महाप्रलयाची पुनरावृत्ती कोल्हापुरात जाणीवपूर्वक घडवून आणल्याबद्दल आपल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह आपल्या विरुद्ध देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
काळम्मावाडी धरणाचे निढोरी (ता. कागल) येथे असणारे कार्यालय हे सदैव बंद कुलपामध्ये असते व अधिकारी फुकटचा पगार घेतात. यास्तव जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी धरण तिथे कार्यालय स्थापित करण्याची घोषणा केली होती. आपण तेच अंमलबजावणी न करता मंत्र्यांच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे सिद्ध होत आहे.
मंत्री महोदय यांच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून धरण स्थळावरील कार्यालयात त्वरित स्थलांतरित करावे तसेच सद्यस्थितीला अनुभव नसलेल्या अभियंत्यांची तात्काळ दुसरीकडे बदली करून अनुभवी अभियंत्यास धरण स्थळावरती पूर्ण वेळ नेमून जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत तेथे सक्तीने निवासी राहण्याचे आदेश आपण तात्काळ द्यावेत अन्यथा आपले विरोधात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
वरील गंभीर बाबींच्या आधारे दूधगंगा धरणाच्या (काळम्मावाडी) आजवर करण्यात आलेल्या व सध्या सुरू असलेल्या गळतीच्या कामांची सखोल चौकशी करून श्रीनिवास कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर व शिवा स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, संभाजीनगर तसेच संबंधित सर्व ठेकेदारांनी शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब ब्लॅकलिस्ट करावे व काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे नवीन टेंडर नव्याने काढून कोल्हापूरच्या जनतेस न्याय द्यावा.
तसेच आजवर झालेल्या सर्व भ्रष्टाचारांची चौकशी करून सर्व संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करून त्यांना त्वरित बडतर्फ करावे.
येत्या ७ दिवसात उपलब्ध बाबींचा निकाल लावून आम्हास लेखी स्वरूपात खुलासा करून धरण स्थळावर आपल्या उपस्थितीमध्ये संयुक्तपणे मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा आयोजित करून धरण स्थळावर मनसे पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक घ्यावी अन्यथा आपल्या विरोधात मनसे स्टाईलने जलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ढोल-ताशांच्या गजरात हल्लाबोल आंदोलन छेडण्यात येईल.
कळावे,
आपले विनीत,
राजू दिंडोर्ले
(जिल्हाध्यक्ष)
प्रसाद पाटील
(शहर अध्यक्ष)
कार्यालय: सह्याद्री, १७७५/ए वॉर्ड, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ, कोल्हापूर
दूरध्वनी: ९३७१७२५११५



