शेतकरी व कारखाना हिताच्या मागण्यांसाठी एकत्रित पाठपुरावा गरजेचा- राजे समरजितसिंह घाटगे ४७ व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विधिवत संपन्न

Spread the news

शेतकरी व कारखाना हिताच्या मागण्यांसाठी एकत्रित पाठपुरावा गरजेचा- राजे समरजितसिंह घाटगे

­

 

४७ व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विधिवत संपन्न

  •  

कागल, प्रतिनिधी : साखर उद्योग सध्या प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे.या उद्योगाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी संघटनांनी शासनाकडे मांडलेल्या मागण्यांचे स्वागत आहे.शेतकरी व कारखाना हिताच्या अशा मागण्यांसाठी एकत्रित पाठपुरावा करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४७व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. राजे समरजितसिंह घाटगे, युवराज आर्यवीर घाटगे,कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे आणि कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्या हस्ते बॉयलरअग्नीप्रदीपन विधिवत करण्यात आले. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री घाटगे पुढे म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांत महागाईमध्ये सतत वाढ झाली आहे; मात्र साखरेचे दर त्या तुलनेत वाढलेले नाहीत. एफआरपी देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेले सॉफ्ट लोनसारखे निर्णय सध्याच्या परिस्थितीत दिलासादायक असले,तरी ते कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाहीत. कारण शेवटी ते कर्जच आहे.तरीसुद्धा या मदतीबद्दल आम्ही राज्य शासनाचे अत्यंतआभारी आहोत.शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे अनेक मागण्या केल्या असून कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी साखरेचा किमान हमीभाव ५० रुपये किलो,इथेनॉल विक्री दर ७० रुपये लिटर करावा, इथेनॉल प्रकल्पांच्या कर्जावरील व्याज माफी व हप्त्यांना मुदतवाढ तसेच साखर कारखान्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांचाही त्यात समावेश आहे.कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर त्यांना ऊसाला चांगला भाव आणि वेळेवर ऊस बिले देण्यास मदत होईल. शेतकरी व कारखाना हिताच्या अशा मागण्यांसाठी एकत्रित पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
स्वागतपर मनोगतात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले,साखरेसह उपपदार्थांनाही शेतीमालाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.तसेच शेतीमालाचे दर केंद्र सरकारच्या महागाई भत्त्याशी जोडण्याची गरज आहे.ऑगस्टमध्ये काही दिवसांकरिता साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा अपेक्षित फायदा कारखाने आणि शेतकऱ्यांना झालेला नाही.सहकारमहर्षी स्वर्गीय राजेसाहेब नेहमी ‘ऊस उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्न वाढविले पाहिजे;अन्यथा कारखान्याने कितीही दर दिला, तरी शेतकऱ्यांना ऊस शेती परवडणार नाही,’ अशी शिकवण देत असत.त्यांच्या विचारांचा आधार घेत शाहू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या माध्यमातून हेक्टरी १५० टनांपर्यंत ऊस उत्पादन घ्यावे,यासाठी ‘टार्गेट बेस’ पद्धतीने नियोजन करून काम सुरू आहे.यावेळी त्यांनी मागील गळीत हंगामाचा आढावा घेत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमास शाहूचे आजी-माजी संचालक, संचालिका, पदाधिकारी, सभासद व शेतकरी उपस्थित होते. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

चौकट

…हा तर राजे साहेबांच्या शिकवणीचा सन्मान

शाहू कारखान्यास नुकताच राष्ट्रीय साखर महासंघाचा देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.सहकारमहर्षी स्वर्गीय राजेसाहेबांची पुरस्कारासह शेतकरी हिताच्या कारभाराची परंपरा अखंडितपणे चालू ठेवल्याबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा सभासद शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सत्कार केला.राजेसाहेबांची शिकवण,सर्व सभासद,ऊस उत्पादक,कर्मचारी व इतर सर्व घटकांच्या सहकार्याचा हा सन्मान आहे.असे कृतज्ञतापर उद्गार घाटगे यांनी काढले.

फोटो कॅप्शन : कागल : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४७व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपनप्रसंगी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, युवराज आर्यवीर घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!