*गोकुळ दूध संघात पक्षीय राजकारण खपवून घेणार नाही; साडेपाच लाख उत्पादकांच्या हितासाठी समविचारी आघाडीला विजय करण्याचे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन!
गोकुळ दूध संघात प्रशासक राज्याची सुरुवात झाल्यानंतर आणि मल्टिस्टेटचा मुद्दा बाजूला पडल्यानंतर सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहकारी संस्थांमध्ये वाढलेला पक्षीय हस्तक्षेप आणि महायुतीमधील नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, दूध उत्पादक सभासदांनी आता संघात पक्षीय राजकारण चालू न देण्याचा ठाम निर्धार केला आहे. हातकणंगले तालुक्यातील सुमारे ८५ ठरावधारकांनी गोकुळच्या आगामी निवडणुकीसाठी राजर्षी छत्रपती शाहू ‘समविचारी आघाडी’ला जाहीर पाठिंबा दिला असून, साडेपाच लाख दूध उत्पादक सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी समविचारी आघाडीला विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे विधानपरिषद गटप्रवर्तक आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
ते पेठवडगाव येथे आयोजित गोकुळ दूध संघ ठराव धारकांच्या मेळाव्यात बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले,
दूध उत्पादक, संस्था, संघ आणि ग्राहक हेच केंद्रबिंदू मानून पक्ष विरहीत समविचारी आघाडीच्यावतीने गोकुळमधील कारभारात सुधारणा करण्यासाठी आणि दूध उत्पादकांच्या आर्थिक हितासाठी एक विस्तृत कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे:
* दूध उत्पादकांसाठी भरीव तरतूद*
दूध उत्पादकांसाठी पेन्शन योजना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने लागू करणे,म्हैस खरेदी अनुदानात वाढ करून ते ७५ टक्क्यांपर्यंत नेणे, मुक्त गोठा अनुदानात वाढ करणे तसेच पशुखाद्याचे दर थेट शंभर रुपयांनी कमी करणे.
*खर्चाला लगाम व इमारत अनुदान:*
संघातील वारेमाप आणि अनावश्यक खर्चाला प्रभावी लगाम घातला जाईल, तसेच दूध संस्थांसाठी इमारत अनुदानात वाढ केली जाईल.
*योग्य दूध दर:*
दूध उत्पादक, दूध संस्था, संघ आणि ग्राहक या चार प्रमुख घटकांच्या हिताचा समतोल साधत योग्य दूध दरवाढ केली जाईल.
*आधुनिक पशुसंवर्धन:* गाई-म्हशींचे योग्य संगोपन व्हावे यासाठी पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम केला जाईल आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाईल.
*पक्षीय राजकारणाला पूर्णविराम देण्याचा निर्धार*
गोकुळ दूध संघ हा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचा कणा आहे. मात्र, महायुतीमधील नेत्यांचे विविध दिशेने सुरू असलेले राजकारण आणि संस्थांमधील वाढलेले कमिशन यामुळे दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, सहकाराला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्यासाठी आणि पारदर्शक कारभार चालवण्यासाठी सभासदांनी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
हातकणंगले तालुक्यातील ८५ हून अधिक ठरावधारकांनी समविचारी आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत सहकाराचे पावित्र्य टिकवण्यासाठी सभासद एकवटावल्याचे स्पष्ट होत आहे.
यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, गुलाबराव पोळ, भगवान जाधव,अॅड.राजवर्धन पाटील, मधुकर जाधव यांची भाषणे झाली.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य कपील पाटील,अॅड. शहाजी पाटील, माजी संचालक रणजितसिंह पाटील, धोंडीराम पाटील, शशिकांत खवरे,चेतन चव्हाण, उत्तम सावंत, बाळासो माने,अरुण सिद, बाजीराव सातपुते, विजय पाटील उत्तम पाटील, प्रकाश झिरंगे, प्रकाश लोकरे, दिपक चव्हाण, अभिजित माने, गुणवंत शिंदे, धैर्यशील शिंदे, गोकुळ चे माजी संचालक रणजितसिंह पाटील, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील (चुयेकर) प्रकाश पाटील,बयाजी शेळके, बाबासाहेब देवकर आदीसह पॅनेल मधील संभाव्य उमेदवार यांच्या सह विविध दूध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



