*दोन मंत्र्यांच्या ओ.एस.डी. ना मात देत शिक्षक मित्र कौस्तुभ गावडेंनी मारली बाजी*
*पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी; शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि शिक्षकांशी थेट संपर्क ठरला जमेची बाजू*
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात मोठी चाल खेळली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारीच्या शर्यतीत दोन मंत्र्यांच्या कार्यालयातील OSD म्हणून कार्यरत असलेल्या इच्छुकांची नावे चर्चेत असताना गावडे यांनी बाजी मारली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD मंगेश चिवटे तसेच मंत्री उदय सामंत यांचे OSD सचिन सानप यांची नावे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी चर्चेत होती. मात्र भाजपने अखेर शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी थेट नाळ असलेला आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारा चेहरा महायुतीने मैदानात उतरवला आहे.
शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे हे शिक्षण क्षेत्रात गेली सात वर्षे कार्यरत असून शिक्षण क्षेत्रातील प्रशासन, शिक्षकांचे प्रश्न आणि संस्थात्मक कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क ही त्यांच्या उमेदवारीची महत्त्वाची जमेची बाजू मानली जात आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांशी असलेला संपर्क, संघटनात्मक बांधणी, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरील भूमिका आणि प्रत्यक्ष आंदोलनांमधील सहभाग यामुळे गावडे यांची उमेदवारी आधीपासूनच चर्चेत होती. त्यामुळे राजकीय अनुभवापेक्षा शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष काम, शिक्षकांशी असलेला संवाद आणि संघटनात्मक ताकद यांना भाजपने प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी पुणे विधानभवनात उमेदवारी अर्जही दाखल केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दरम्यान भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीला आता वेगळे राजकीय वळण मिळाले आहे. दोन मंत्र्यांच्या OSDच्या चर्चेला मागे टाकत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्याला संधी देण्याचा भाजपचा निर्णय आगामी निवडणुकीत कितपत निर्णायक ठरतो, याकडे संपूर्ण शिक्षक मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.



