टीकेआयईटी मध्ये ‘वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब’चे दिमाखदार उद्घाटन

Spread the news

टीकेआयईटी मध्ये ‘वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब‘चे दिमाखदार उद्घाटन

­

 

वारणानगर (विशेष प्रतिनिधी):

  •  

ऑक्टोबर महिन्यातील जागतिक सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे औचित्य साधून, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) येथे ‘सायबर सुरक्षा जनजागृती’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सायबर सिक्युरिटी स्टुडंट्स असोसिएशन (CYSA) आणि एनसीसी (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ‘वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब’चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायबर कॉलेज कोल्हापूर विभागाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये सायबर जनजागृतीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे डिजिटल व्यवहार, पासवर्ड सुरक्षितता आणि सोशल मीडियाचा गैरवापर यांसारख्या विषयांवरून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सदर उपक्रमास वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. आमदार श्री. विनयरावजी कोरे (सावकर) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आणि प्रोव्होस्ट श्री. एन. एच. पाटील सर  आणि वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के सर यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय हरुगडे उपस्थित होते. तसेच शाहूवाडी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. प्रणिल गिल्डा, पोलीस उपअधीक्षक श्री. संजय डोर आणि प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक श्री. श्रीकांत थिकाणे  यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी होते, तर व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील आणि डीन डॉ. एस. एम. पिसे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सायबर विश्वातील आव्हानांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि जबाबदारी बाळगणे ही काळाची गरज आहे.” जीवनात आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांनी ‘3-D’ चे सूत्र मांडले. Devotion (भक्ती/निष्ठा), Dedication (समर्पण) आणि Determination (दृढनिश्चय) या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास कोणतीही व्यक्ती अभूतपूर्व यश संपादन करू शकते, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी दैनंदिन जीवनात घडणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचावाचे उपाय विशद केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली कोल्हापूर पोलीस सायबर सुरक्षा जनजागृती व्हॅन (Cyber Security Awareness Van) कॅम्पसमध्ये दाखल झाली होती. या व्हॅनच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि एनसीसी कॅडेट्सना सायबर गुन्हेगारी, डेटा सुरक्षा आणि सुरक्षित इंटरनेट वापराचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण डीन डॉ. एस. एम. पिसे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सुभाष कोळी यांनी केले. सायबर सिक्युरिटी विभागाच्या विद्यार्थिनी प्रगती आणि स्वप्ना यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायबर सिक्युरिटी विभागप्रमुख प्रा. राजेश गाडे, एनसीसी अधिकारी प्रा. लेफ्टनंट आर. बी. नाईक आणि प्रा. लोचन आदूलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!