शासनाच्या शाही दसरा महोत्सवांतर्गत १ नोव्हेंबरला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर, दि. २९ ऑक्टोबर : शासनाच्या शाही दसरा महोत्सव–२०२६ अंतर्गत एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजन श्री व्यंकटेश्वरा जिल्हा चेस असोसिएशन, कोल्हापूर यांच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा नागाळा पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे.
या स्पर्धेसाठी आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नगर विकास राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड (भा.प्र.से.) आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड (भा.प्र.से.) यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, तर्कशक्ती, नियोजन, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करण्याबरोबरच नवोदित व युवा खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. शाही दसरा महोत्सवाच्या माध्यमातून बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन मिळून जिल्ह्यातील बुद्धिबळ चळवळीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी बँक ऑफ बडोदा, कोल्हापूर यांचे मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य लाभत आहे. तसेच पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अँड ज्वेलर्स (PNG), कोल्हापूर तसेच डॅा.नेहा तेंडुलकर अध्यक्षा,स्वराज्य महिला मंच कोल्हापूर यांचेही बुद्धिबळ स्पर्धेच्या प्रसार व प्रोत्साहनासाठी सहकार्य लाभत आहे.
भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव यांच्या सहकार्याने स्पर्धेसाठी सभागृह, खुर्च्या व टेबल विनामूल्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांमुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आवश्यक सोयी उपलब्ध होणार आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री व्यंकटेश्वरा जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय तेंडुलकर, उपाध्यक्ष श्रीमती पुष्पलता के. मंगल, सचिव श्री. अनंत अष्टेकर, तसेच श्री. बाबासाहेब मंगल, श्री. धीरज पाटील, डॉ. युवराज देवाणे, डॉ. सुशांत गिरगावकर, श्री. चिंतामणी करजगी, श्री. कृष्णांत पाटील आणि श्रीमती श्वेता कुलकर्णी पुढाकार घेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन शाही दसरा महोत्सवाच्या माध्यमातून बुद्धिबळाच्या प्रसाराला हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



