*कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी*

Spread the news

*कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी*

­

 

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी कृष्णा नदीचे अतिरिक्त पूरपाणी भीमा नदीमार्गे उजनी जलाशयात वळविण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने सर्वतोपरी सहकार्य करावे आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलद करावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना नुकतेच निवेदन दिले.
दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात मोठे नुकसान होते. त्याच वेळी राज्यातील सोलापूर, मराठवाडा आणि इतर दुष्काळी भाग पाण्यासाठी तहानलेले असतात. त्यामुळे पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळविल्यास दोन्ही प्रश्न एकाच वेळी सुटू शकतात, अशी या प्रकल्पामागची संकल्पना आहे.
प्राथमिक अभ्यासानुसार, या प्रकल्पाद्वारे कृष्णा नदीतील सुमारे ५० टीएमसी अतिरिक्त पाणी, १३५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून ९० दिवसांच्या कालावधीत भीमा खोऱ्यात आणण्याचे नियोजन आहे. कृष्णा जलविवाद न्यायाधिकरण-१ ने महाराष्ट्राला एकूण ५८५ टीएमसी पाणी एकत्रित स्वरूपात वापरण्याची मर्यादा दिली आहे. त्यामुळे पुराच्या काळात हे अतिरिक्त ५० टीएमसी पाणी भीमा खोऱ्यात वळविल्याने न्यायाधिकरणाच्या अटींचे कोणतेही उल्लंघन होत नाही, असे खासदार महाडिक यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
सुमारे १३ हजार ६२२ कोटींचा प्रकल्प, १.२५ लाख हेक्टरला सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देईल. या प्रकल्पाचा प्राथमिक व्यवहार्यता अहवाल (PFR) २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सादर करण्यात आला आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च १३,६२२ कोटी रुपये आहे. त्यातून सुमारे १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. तसेच गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाणी वाहून नेण्याच्या पद्धतीने, मराठवाडा विभागाला २३.६६ टीएमसी पाणी देण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.
सध्या या प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने २९ सप्टेंबर २०२५ रोजी कृष्णा खोऱ्यातील पाण्याच्या पुनर्वाटपाबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य पातळीवरची प्रक्रिया वेगाने पुढे जात असल्याने आता केंद्राच्या मंजुरीची गरज आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून या प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया जलद करावी आणि प्रकल्पाला आवश्यक ते सहकार्य व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर सोलापूर आणि मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळेल. या प्रकल्पामुळे राज्याच्या जलसमृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे. खासदार महाडिक यांच्या या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा दुष्काळी भागातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!