*1 ते 5 मार्च कालावधीत व्ही. टी. पाटील स्मृतीभवन येथे*
*मिलेट (तृणधान्य) व फळ महोत्सव 2025 चे आयोजन*
*कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने दिनांक १ ते ५ मार्च २०२५ या कालावधीमध्ये ‘मिलेट व फळ महोत्सव-२०२५’ चे व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजन येणार आहे. या मिलेट व फळ महोत्सवाचे उद्धघाटन शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.*
या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन , पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक महेश कदम, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, विभागीय कृषि सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगारे हे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत विविध फळ महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केलेले होते. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.
या महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियेमध्ये काम करणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या व सांगली जिल्ह्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये ४० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असुन, ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात आलेला ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने व द्राक्षे थेट उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या मिलेट महोत्सवामध्ये मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व याविषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, मिलेट आधारित महिलांसाठी पाककृती स्पर्धा, खरेदीदार-विक्रेते संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास करवीर वासियांनी उपस्थित राहून मिलेट व फळ महोत्सवास भेट देण्याचे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.
*****