२ एप्रिल रोजी स्नेह संगीत प्रतिज्ञा गीत मैफिलींचे ८ व्या वर्षात पदार्पण”
९ दिवस ९ ज्येष्ठांच्या गीत मैफिलींनी रंगणार
“नवपालवी गीत महोत्सव”
सलग २५५७ दिवसात सलग ३२२८ गीत मैफिलींतून गरजूंना अंदाजे ४५ लाखांचा निधी थेट सुपूर्त.
कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था ही गेल्या २६ वर्षांपासून नाट्यप्रयोग आणि संगीत मैफिलीं सादर करून त्यात जमा झालेला निधी गरजवंतांच्यासाठी विनीयोगात आणत आहे. गेल्या सात वर्षांपूर्वीपासून स्नेह संगीत प्रतिज्ञा ही दैनिक मैफिल सुरू आहे.
ना नफ्यासाठी ना.. स्वार्थासाठी,
ना पद.. प्रतिष्ठा.. सन्मानासाठी,
आमची गीत मैफिल..
गरजवंतांच्या आधारासाठी.
या ब्रीदवाक्यानुसार “ध्येय सक्त, श्रेय मुक्त” या नुसार सुरू असलेले हे कला मानवता कार्य स्नेह संगीत प्रतिज्ञा या उपक्रमाद्वारा ८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २ एप्रिल २०१९ रोजी कर्करोग ग्रस्त गायक हबीब सोलापुरे यांना गायनाचा आनंद देण्यासाठी ३६५ दिवसांत ३६५ गीत मैफिलींचा संकल्प करण्यात आला. दुर्दैवाने हबीब भाई सोलापुरे यांचे १६६ व्या मैफिली नंतर दुःखद निधन झाले परंतु “चॅरिटी अँड शो मस्ट गो ऑन” यानुसार एकही दिवसाचा खंड न पडता रोजच गीत मैफिली सुरू आहेत. सुरुवातीला आनंद हॉल, केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू स्मारक भवन या ठिकाणी या गीत मैफिली सादर झाल्या. रसिक श्रोत्यांना ऐच्छिक शुल्कचे आवाहन केले जायचे. जो काही ऐच्छिक निधी जमा व्हायचा तो गरजूंना तिथल्या तिथे दिला जायचा. कोरोना कालावधीमध्ये जगभरातील सर्व सांस्कृतिक उपक्रम पूर्ण थांबलेले असताना सुद्धा कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत येथे असलेल्या विकास प्रतिज्ञा स्टुडिओ येथून प्रशांत जोशी यांच्या फेसबुक लाईव्ह वरून या गीत मैफिली सुरूच राहिल्या.
आता २ एप्रिल २०२६ रोजी हा उपक्रम आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या सात वर्षांमध्ये सलग ३२२८ गीत मैफिलीतून वैद्यकीय उपचारासाठी, शिक्षणासाठी व इतर कारणाकरिता अंदाजे ४५ लाखांचा निधी गरजूंना दिला गेला आहे. आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ पर्यंत ९ ज्येष्ठ गायकांचा “नवपालवी गीत महोत्सव” आयोजित केला आहे. या महोत्सवात वय वर्षे ६० पासून ते वय वर्ष ८४ असलेले ज्येष्ठ नागरिक, गायक आपली गायन कला सादर करतील. विकास प्रतिज्ञा स्टुडिओ येथे महोत्सव कालावधीत रोज सायंकाळी ७ वाजता या मैफिली फेसबुक लाईव्ह वरून सादर होतील. स्टुडिओत १० रसिक श्रोत्यांसाठी आसन व्यवस्था उपलब्ध असून फोन बुकिंग द्वारा आपले आसन आरक्षित करता येईल. मैफिलीस ऐच्छिक शुल्क आहे. २ एप्रिल रोजी, विजय देशपांडे (वय वर्षे ८७) यांच्या गायनाने महोत्सवाचा प्रारंभ होईल, त्या नंतर, ३ एप्रिल रोजी शशिकांत नाईक, ४ एप्रिल रोजी महादेव बोडके, ५ एप्रिल रोजी नरहर कुलकर्णी, ६ एप्रिल रोजी सुधीर अलगौडर, ७ एप्रिल रोजी अरुण कुलकर्णी, ८ एप्रिल रोजी अमरसिंग राजपूत, ९ एप्रिल रोजी सुहास शेलार आणि १० एप्रिल रोजी दिलीप माळी यांच्या गीत मैफिलीने महोत्सवाची सांगता होईल. खर्चात बचत व्हावी आणि जास्तीत जास्त रक्कम गरजवंतांना देण्यास शिल्लक रहावी याकरिता या मैफिली ट्रॅक द्वारा सादर होतील. या महोत्सवातून जमा होणारा निधी गरजवंतांसाठी तसेच स्टुडिओच्या मेंटेनन्स साठी विनियोगात आणला जाणार आहे. तरी या गीत मैफिलींना रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
.
दिनांक : २ ते १० एप्रिल २०२६
वेळ : रोज सायं. ७ वा.
स्थळ : विकास प्रतिज्ञा स्टुडिओ, विठ्ठल पार्क बेसमेंट, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.





