दक्षिण महाराष्ट्रातील 300 पर्यटक अडकले दुबईत
सात विद्यार्थीही अडचणीत
दुबई, अबुधाबी, शारजाह यासह विविध देशात पर्यटनासाठी गेलेले दक्षिण महाराष्ट्रातील 300 पेक्षा अधिक पर्यटक तेथे अडकले आहेत. दरम्यान, जॉर्जिया विद्यापीठात शिकायला जाण्यासाठी निघालेले कोल्हापुरातील सात विद्यार्थी शारजाह विमानतळावर अडकले आहेत.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून गेल्या आठ दिवसात 300 पेक्षा अधिक पर्यटक दुबई व त्या शेजारच्या विविध आखाती देशात फिरायला गेले आहेत. त्यामध्ये कोल्हापुरातील 110 पर्यटकांचा समावेश आहे. विमान सेवा बंद झाल्यामुळे हे सर्व पर्यटक तेथे अडकले आहेत. काही प्रवासी विमानतळावर तर काही हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.
जॉर्जिया विद्यापीठात शिकण्यासाठी निघालेले सात विद्यार्थी काल शारजाह विमानतळावर पोहोचले. पण; तेथून अचानक विमानसेवा बंद पडल्यामुळे ते तेथेच अडकले आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन विविध देशात फिरायला जातात. पण; दोन दिवस सुरू झालेल्या युद्धामुळे अनेकांनी आपले बुकिंग रद्द करायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे.
कोट
दुबईसह विविध ठिकाणी अडकलेले दक्षिण महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. तेथील मराठी
मंडळही या पर्यटकांची काळजी घेत आहे.
बळीराम वराडे अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन कोल्हापूर





