महाराष्ट्राची कन्या जिजाऊ पाटीलची सुवर्ण हॅटट्रिक! १३ वर्षांच्या खेलो इंडिया ऍथलीटची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

Spread the news

 

महाराष्ट्राची कन्या जिजाऊ पाटीलची सुवर्ण हॅटट्रिक!

१३ वर्षांच्या खेलो इंडिया ऍथलीटची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

  •  

 

कोल्हापूर, ता.२५ :कोल्हापूर जिल्ह्यातील आसगाव ता.पन्हाळा येथील केवळ १३ वर्षांची खेलो इंडिया ऍथलीट व उदयोन्मुख फेन्सिंगपटू जिजाऊ पाटील हिने आपल्या अचूक तंत्र, चपळाई आणि धडाडीच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण हॅटट्रिक नोंदवत महाराष्ट्रासाठी अभिमानाची सुवर्णकथा रचली आहे.

८ ते १० ऑगस्ट २०२५ रोजी हिंगोली येथे झालेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर फॉइल फेन्सिंग स्पर्धेत तिने सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावून हॅटट्रिक साधली. तसेच २२ ते २४ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे झालेल्या कॅडेट राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धेत तिने वैयक्तिक सुवर्ण व टीम सुवर्ण पटकावत दुहेरी यश संपादन केले. या चमकदार कामगिरीच्या जोरावर जिजाऊची पांडिचेरी व उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यापूर्वीही तिने सलग दोन वर्षे राष्ट्रीय सब-ज्युनियर फेन्सिंग स्पर्धेत पाच पदकांची कमाई करून देशपातळीवर आपली विजयी छाप उमटवली आहे. वयाच्या अकराव्या वर्षी थायलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावत तिने परदेशी रंगमंचावरही आपल्या क्षमतेची झलक दाखवली होती.

फेन्सिंग हा खेळ ऑलिंपिकमध्ये सुरुवातीपासून प्रतिष्ठेचा मानला जातो. जिजाऊने २०२१ मध्ये या खेळात पदार्पण करून अवघ्या चार वर्षांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती अहमदाबादमधील विजयभारत स्पोर्ट्स येथे कोच विजयकुमार व भवानी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्याआधी पुण्यातील एनगार्ड फेन्सिंग अकॅडमी येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता चंडालिया व बोमायसर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पायाभरणी केली. अलीकडेच तिने इटलीतील जगप्रसिद्ध फ्रास्कती स्केर्मा अकादमी( Frascati Scherma Academy)मध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते कोच व्हॅलेरियो अ‍ॅस्प्रोमोंटे( Valerio Aspromonte) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिने कसून प्रशिक्षण घेतले. या प्रतिष्ठित अकॅडमीत प्रशिक्षण घेणारी सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरण्याचा मानही जिजाऊला मिळाला आहे भविष्यात भारतासाठी सुवर्णपदक आणने हे तिचे लक्ष्य आहे .
दररोज सहा ते सात तासांचा सराव, खेळासोबत शिक्षणातली तितकीच सक्रियता या दोन गोष्टींनी जिजाऊची वाटचाल अधिक बळकट केली आहे. सध्या ती पुण्यातील अक्षरनंदन शाळेत शिक्षण घेत आहे.मात्र फेन्सिंग हा खर्चिक खेळ असल्याने प्रवास, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण व अत्याधुनिक साहित्य यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता असते. जिजाऊने आतापर्यंत आपल्या मेहनतीने आणि कुटुंबाच्या अथक पाठबळाने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. पण तिची वाटचाल आणखी भक्कम करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी तसेच सहकारी संस्था, विविध समूहांनी तिच्या प्रवासात आधारवड बनून साथ दिली, तर जिजाऊच्या हातून देशाच्या गळ्यात ऑलिंपिक सुवर्णमाळा नक्कीच पडेल.

तिची अथक मेहनत व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाले आहे. या यशामध्ये तिला तिचे आजोबा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.पी.डी.पाटील आसगावकर, वडील जीवन पाटील, आई मनिषा पाटील, तसेच पाटील कुटुंबियांचे सहकार्य लाभले आहे.तिच्या या सुवर्णयशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह तयार झाला आहे.

————————————————————————————————

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!