*भागीरथी पतसंस्था – वार्षिक सभा*
*भागीरथी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न, पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज डिजिटल आणि ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्नशिल, अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती*
महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या उद्देशाने स्थापन केलेल्या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा, आज खेळीमेळीत पार पडली. जनतेमध्ये विश्वासार्हता वाढल्याने, संस्थेची आर्थिक प्रगती वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसात पतसंस्थेचे कामकाज डिजिटल आणि ऑनलाईन स्वरूपात करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी दिली.
भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ सौ. अरूंधती महाडिक, महिला सक्षमीकरणाचं काम करत आहेत. त्यानंतर गेल्या वर्षी भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रोत्साहनातून स्थापन झालेल्या भागीरथी पतसंस्थेने अल्पावधीत जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेचे सध्या ३ हजार २०० सभासद आहेत. तर २ कोटी रूपयांपेक्षा अधिक ठेवी आहेत. अहवाल सालात पतसंस्थेकडून ६४ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून, खेळते भाग भांडवल ४१ लाख २५ हजार रुपये आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात, भागीरथी पतसंस्थेला चांगला ढोबळ नफा झालाय. अशा या पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा, आज सौ. अरूंधती महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि तज्ञ संचालक पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक यांच्यासह सर्व संचालक आणि सभासदांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. प्रारंभी पतसंस्थेचे अंतर्गत लेखापरिक्षक शिवराज मगर यांनी, आर्थिक ताळेबंद जाहीर केला. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत, सौ. अरूंधती महाडिक आणि पृथ्वीराज महाडिक सहभागी झाले होते. या पिरषदेत जगभरातील सहकार क्षेत्रातील घडामोडींची माहिती सौ. महाडिक यांनी घेतली आहे. त्याबद्दल सौ. अरूंधती महाडिक यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी संगीता खाडे, अनुराधा सामंत यांच्यासह काही महिलांनी सकारात्मक आणि विधायक सूचना केल्या. तर भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांचेही भाषण झाले. गेल्या दोन वर्षात पतसंस्थेने केलेली प्रगती समाधानकारक असल्याचे त्यांनी नमुद केले. महिलांचा सर्वांगिण विकास हेच उद्दीष्ट ठेवून या पतसंस्थेची स्थापना झाली असून, महिलांना सुक्ष्म आर्थिक नियोजन करण्याची प्रेरणा मिळाली असे विश्वराज महाडिक यांनी नमुद केले. तर पृथ्वीराज महाडिक यांनी, संस्थेच्या पारदर्शी कारभाराची माहिती देत, महिलांना घरगुती उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच संस्थेची स्वमालकीची इमारत आणि सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्याची सूचनाही पृथ्वीराज महाडिक यांनी केली. तर सौ. अरूंधती महाडिक यांनी, भागीरथी पतसंस्था आणि सभासद महिला यांच्यात गेल्या दोन वर्षात अतुट नातं निर्माण झाल्याचे नमुद केले. केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता या पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे त्यांनी नमुद केले. येत्या काही दिवसात पतसंस्थेचे कामकाज डिजिटल आणि ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांनी जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करावे, असे आवाहनही सौ. महाडिक यांनी केले. यावेळी सभासदांच्यावतीनं सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्मिता माने, प्राजक्ता घोरपडे, अर्पिता जाधव, प्रियांका अपराध, पुष्पा पोवार, भाग्यश्री शेटके, मंगल बनसोडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.