*महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची मंत्रालयात बैठक संपन्न*
*तज्ञ समितीची दर तीन महिन्यांनी बैठक; सीमा भागातील नागरिकांचे प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांसोमवेत बैठक*
मुंबई,१० : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सह-अध्यक्ष धनंजय महाडिक, सदस्य दिनेश ओउळकर, अॅड महेश बिर्जे, अॅड. शिवाजीराव जाधव, अॅड. संतोष काकडे तसेच अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या.
बैठकीत सीमा प्रश्नासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले. तज्ञ समितीने घेतलेले निर्णय आता उच्चाधिकार समिती म्हणजेच हाय पावर कमिटीसमोर मांडण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. याशिवाय तज्ञ समितीची बैठक दर तीन महिन्यांनी नियमित घेण्याचेही ठरले.
सीमा भागातील नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यात येईल, असेही बैठकीत ठरले.
बैठकीदरम्यान विशेषतः सीमा भागातील मुलांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर तसेच उच्च तंत्र शिक्षण महाविद्यालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
००००००००