*छत्रपती राजाराम महाराजांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या कोल्हापूर व फॉरेनसमधील दीडशे वर्षांच्या ऋणानुबंधांना मुंबईत मिळाला उजाळा*
*कुमार केतकर यांनी लेखिका सौ.नंदितादेवी घाटगे यांच्याशी साधला संवाद*
कोल्हापूर प्रतिनिधी.
पाश्चात्त्य शिक्षण प्रणालीची माहिती घेण्यासाठी युरोप अभ्यास दौर्यावर असताना कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज (द्वितीय) यांचे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी फ्लॉरेन्स (इटली) येथे निधन झाले.तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून स्थानिक प्रशासनाने त्यांची समाधी व पुतळ्यासह स्मारक उभारले. आज दीडशे वर्षांनंतरही कोल्हापूर व फ्लॉरेन्सचे ऋणानुबंध या स्मारकाच्या माध्यमातून जपले आहेत.या ऋणानुबंधांना मुंबईच्या वरळीमधील नेहरू सेंटरमध्ये ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर यांनी लेखिका नंदितादेवी घाटगे यांच्या ओघवत्या शैलीत मराठी व इंग्रजीमधून घेतलेल्या मुलाखतीतून उजाळा मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी छत्रपती शाहू महाराज व ब्रिटिश राजवट काळातील कोल्हापूर संस्थांनमधील त्यांचे शैक्षणिक कार्य,घाटगे घराण्याचा इतिहास असे विविध पैलू या निमित्ताने रसिकांसमोर उलगडले.तब्बल दोन तासाच्या संवादातून रसिकांना इतिहास पर्वाची पर्वणी अनुभवावयास मिळाली.
कोल्हापूरपासून शेकडो मैल दूर इटलीमधील फ्लॉरेन्सच्या अर्ना नदी व मुगनोने प्रवाह यांच्या संगमावरील ‘केसीन पार्क’ येथे करवीरचे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुतळ्याच्या चारही बाजूंवर रोमन, इंग्रजी, मराठी,इटालियन
या भाषांमध्ये महाराजांबद्दल माहिती कोरली आहे.स्मारक पुर्णत्वासाठी कोल्हापूरचे तत्कालीन रिजेंड जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे यांनी योगदान दिले.स्मारकासभोवतीच्या तब्बल १५० हेक्टर जागेत कॕसीना पार्क नावाचे उद्यान विकसित केले आहे.तर स्मारकाला ते ‘इंडियानो’असे प्रेमाने म्हणतात. स्मारकाची देखभाल-दुरुस्तीही स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी केली जाते. ४० हजार युरो खर्चून स्मारकाचे जतन-संवर्धन आणि नूतनीकरणही करण्यात आले. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल परदेशात आपुलकी आहे.पण स्थानिकांना विसर पडला आहे.अशी खंत यावेळी व्यक्त केली.
राजाराम महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाला सौ.घाटगे यांनी. ‘छत्रपती राजराम महाराज :अ महाराजा इन फ्लॉरेन्स’ या नावाने दोनशे पानी इंग्रजी व मराठी भाषेत पुस्तकबद्ध केले आहे.त्याचे प्रकाशन एक वर्षापुर्वी इटली येथे झाले. लवकरच याचे इटालियन भाषेतही भाषांतर करण्यात येणार आहे.
इसवी सन 1872 मध्ये प्रकाशित झालेल्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या डायरीतील माहितीच्या आधारे 2018 मध्ये इटलीतील स्थानिक पत्रकार व अॅड. डिएड्री पेरो यांच्या मदतीने तेथील पुराभिलेखागारातून माहिती संकलन केली. इटालियन भाषेतून याचे भाषांतरही केले. या माहितीच्या आधारे इटालियन भाषेतील पुस्तकनिर्मितीचा निर्णय झाला होता. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर इंटरनॅशनल स्कूल ऑफ फ्लॉरेन्समध्ये सौ. नंदिता घाटगे यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यासह एकूणच मराठा सम्राज्याच्या इतिहासाचा मागोवा घेतला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाची दखल इटलीतील स्थानिक माध्यमांनी आवर्जून घेतली. व त्यांना याविषयी व्याख्यान देण्यासाठी २०२४मध्ये खास निमंत्रित करण्यात आले होते.
सौ.घाटगे यांनी पाच वर्षे अभ्यास व संशोधन करून ‘घाटगेज : द राईज ऑफ अ रॉयल डायनेस्टी’ या इसवी सन 1398 ते 2022 या कालखंडाच्या इतिहासाचा मागोवा घेणार्या 400 पानांच्या दोन खंडांची निर्मिती नुकतीच केली.
मुख्य ग्रंथपाल आरती देसाई यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी प्रवीणसिंहराजे घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे वीरेंद्रसिंहराजे घाटगे,विनीता कामटे,पद्माराजे पटवर्धन,कांचन अनेजा, ,संयोगिता मोरारजी,आरती सुरेंद्रनाथ,केशव जाधव यांच्यासह राज्यभरातील इतिहासप्रेमी उपस्थित होते.
छायाचित्र मुंबई येथे लेखिका सौ नंदितादेवी घाटगे यांच्याशी मुलाखतीद्वारे संवाद साधताना ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर