*१५ वर्षापेक्षा अधिक काळ महापालिका ताब्यात असूनही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आजवर केवळ भ्रष्टाचार,
विकासाचा एकही प्रकल्प शहरात राबवला नाही, खासदार धनंजय महाडिक यांचे टीकास्त्र*
१५ वर्षापेक्षा अधिक काळ कोल्हापूर महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या विकासाचा एकही प्रकल्प राबवला नाही. माजी गृह राज्यमंत्र्यांनी फक्त थेट पाईप लाईनचा एक प्रकल्प आणला. तोही अपूर्णावस्थेत असल्याने, शहरातील महिला आजही घागर घेऊन पाण्यासाठी भटकत आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिका महायुतीच्या ताब्यात द्यावी. शहराच्या प्रश्नांची कालबध्द सोडवणूक करु, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून, कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक ६५ मध्ये ७ कोटी ६७ लाख रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ६६ मध्ये २ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतून, स्वातंत्र्य सैनिक वसाहतीत अंतर्गत रस्ते, गटारी, शाळा कपौंड, स्वच्छतागृह अशी कामे झाली आहेत. या कामांचे आज लोकार्पण करण्यात आले. एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर जकात नाकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आणि रेव्हेन्यू कॉलनी ड्रेनेज कामाचा शुभारंभ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा रुपाराणी निकम, संग्राम निकम, महेश वासुदेव, प्रा. रमेश मिरजकर, नामदेव नागटिळे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक मास्टर्स जलतरण स्पर्धेत २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक मिळवलेल्या, आयकर विभागाचे अधीक्षक रोहीत हवालदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच लेफ्टनंट पदी निवड झालेल्या शर्विल लाड याला गौरवण्यात आलं. येत्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोल्हापूरवासीयांनी भाजप आणि महायुतीला महापालिकेची सत्ता द्यावी. त्यातून शहराचे प्रश्न साेडवले जातील, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील आणि कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान प्रभाग क्रमांक ६६ मध्ये पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण खासदार महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तर नव्या विकासकामाचा शुभारंभ झाला. त्यामध्ये शाहू पार्क मधील रेव्हेन्यू कॉलनीतील रस्त्याचा आणि मोरेवाडी रस्त्याचा समावेश आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील अंतर्गत रस्ते, गटारीसह पायाभूत सुविधांची पूर्तता करु, अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. तर महापालिकेत महायुतीला सत्ता मिळाल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे शहराचा गतीमान विकास होईल, असं प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा वास्कर, संजय वास्कर, पाचगावचे भिकाजी गाडगीळ, उज्ज्वल लिंग्रस, प्रशांत शिंदे, सुखदेव बुध्याळकर, इस्माईल बागवान यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.