*तिन्ही जिल्ह्यांची व्हिजन डॉक्युमेंट सर्व पक्षीय आमदार, मंत्री आणि सरकार समोर सादर केली जाणार; आमदार सतेज पाटील*
*उद्योगांच्या नवीन संकल्पना दळणवळणाच्या सुविधा आणि कौशल्य विकास या माध्यमातून कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर विकसित करावा; व्हिजन बैठकीतील सूर*
*कोल्हापूर :* उद्योगांच्या नवीन संकल्पना दळणवळणाच्या सुविधा आणि कौशल्य विकास या माध्यमातून कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर
विकसित करावा. असा सूर आज झालेल्या व्हिजन बैठकीत उमटला.
कोल्हापूर, सांगली, सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांची हॉटेल सयाजी येथे ही बैठक संपन्न झाली. या तिन्ही जिल्ह्यांची व व्हीजन डॉक्युमेंट तयार करून ती सर्व पक्षीय आमदार, मंत्री आणि सरकार समोर सादर केली जाणार असल्याचेही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील त्यांच्या संकल्पनेतून, कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत या तिन्ही जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक व्हिजन बैठक आज हॉटेल सयाजी येथे संपन्न झाली. या बैठकीत, उद्योग, कला, क्रीडा, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, पर्यावरण तज्ञ, बांधकाम व्यवसायिक, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सुचना मांडल्या. कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल यावर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करण्याबरोबरच विकासाच्या दृष्टीने सूचना केल्या.
दळणवळणाशी निगडीत साधने आणि पायाभूत सुविधा यांची उभारणी करून औद्योगिक त्याचबरोबर कृषी, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, ॲग्रो टुरिझम, अशा विविध क्षेत्रात प्रगतीच्यादृष्टीने विकास कसा साधता येईल. यावरही या व्हीजन बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली. याची एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून, कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांच्या विकासासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करण्याबाबतही या व्हीजन बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे या भौगोलीक परिस्थितीचा फायदा या जिल्ह्यांच्या विकासाकरिता कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांच्या साठी ड्राय हब, त्याचबरोबर मेट्रो रेल्वे करता येईल काय. त्यासाठी देखील येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोल्हापुरातील विमानतळ त्याचबरोबर सर्किट बेंच यामुळे सांगली आणि सातारा या जिल्ह्यांची कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे पुढील पंधरा वर्षातील विकासाचे नियोजन करूया असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले. याशिवाय आज झालेल्या व्हिजन बैठकीत, तिन्ही जिल्ह्यांच्या दृष्टीने जी विकासात्मक चर्चा झाली त्याची व्हिजन डॉक्युमेंट तयार करून, सर्वपक्षीय आमदार, त्याचबरोबर सरकार समोर सादर केली जाणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. येणाऱ्या काळात कोल्हापूर सांगली सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रयत्न करूया अशी साद देखील आमदार सतेज पाटील यांनी घातली.
या बैठकीत कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सूचना मांडल्या. यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर व्हावा ही काळाची गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले. तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाकरिता औद्योगिक कनेक्टिव्हिटी, वाहतूक कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. याशिवाय कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे माल वाहतूक जलद होईल, ज्यामुळे व्यापार वाढेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. अशा सूचनाही यावेळी मांडण्यात आल्या.
तर महामार्गांच्या आसपास नवीन औद्योगिक वसाहती उभारल्या जाऊ शकतात. यामुळे जिल्ह्यांमधील उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. तसेच कोल्हापूरची प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आणि इतर हस्तकला, खाद्य पदार्थ या उत्पादनांना मोठी बाजारपेठ आहे.तसेच सांगली आणि सातारा येथील वस्तूंचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळ कॉरिडॉर अंतर्गत काम करता येईल. तर कोल्हापूरचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळे, जसे की श्री अंबाबाई मंदिर, आणि सातारा जिल्ह्याला जोडणारे किल्ले आणि निसर्गरम्य स्थळे पर्यटकांसाठी सहज उपलब्ध होतील. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे त्या दृष्टीने येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
कृषी उत्पादनांची जलद वाहतूक तसेच कृषी पर्यटन यावरही अधिक भर देण्याची मागणी करण्यात आली. एकूणच निसर्गाशी सुसंगत आणि मानवी मूल्यांशी सुसंगत कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार करण्याबाबत अनेकांनी आपले विचार मांडले. सांगली जिल्ह्यातील चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य सांगली जिल्ह्यातील रवींद्र भानगावे, सांगली जिल्ह्यातील किशोर पठवर्धन, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट चे चेअरमन सचिन पाटील, सांगलीतील मराठा उद्योग क्रांती संघटनेचे चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष के . पी. खोत, क्रीडाइचे माजी अध्यक्ष राजीव पारिख, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार आदींनी कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल यावर सूचना केल्या.
यावेळी वरिष्ठ पत्रकार श्रीराम पवार, उद्योगपती मोहन मुल्हेरकर, प्रदिपभाई कापडिया, सुरेंद्र जैन, गिरीश चितळे, सचिन पाटील, रवींद्र खिलारे, किशोर पटवर्धन, अरुण शहा, चंद्रकांत पाटील, महेश आवटे, उज्ज्वल नागेशकर, आनंद माने, मयूर राणे, ॲड. प्रियांका राणे- पाटील, अमरजा निंबाळकर, देवश्री सतेज पाटील, राजीव पारिख, उदय गायकवाड, संजय शेटे, क्रिडाईचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, सकाळचे संपादक निखिल पंडितराव, तरूण भारतचे संपादक श्रीरंग गायकवाड, कोल्हापूर इंजिनियरींग असोशिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, वालचंद कॉलेजचे डायरेक्टर डॉ. उदय दबडे, शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नितीन सोनजी, आयआयटीचे प्राचार्य डॉ. अनिल कोळेकर, स्किल डेवलपमेंट फोरमचे करिम, अजय दळवी, ओंकार पोळ, कृष्णकांत माळी, मयुर रानडे, संजीव संकपाळ, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, यांच्यासह उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, व्यवसाय, शिक्षण, संशोधन, माध्यम आदी क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी केले.