*५०० कोटींच्या ठेवी तर संस्थांच्या पोटावर पाय का?; संस्था प्रतिनिधींचा संतप्त सवाल*
*गोकुळच्या कार्यकारी संचालकांना घातला घेराव*
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने मोठा गाजावाजा करत चालू वर्षी १३६ कोटी रुपयांचे फरक बिल अदा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. पण या बिलातून तब्बल ४०% रक्कम डिबेंचर म्हणून कपात करण्यात आली आहे. त्यामुळे दूध संकलन करणाऱ्या संस्थांचे गणित बिघडले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एकेका संस्थेचे सात ते आठ लाख रुपये कपात केल्यामुळे सभासदांना फरक वाटताना संस्थांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे संस्था सभासदांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच नाराजीचा उद्रेक आज झाला. जवळपास २०० संस्थांच्या प्रतिनिधींनी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भेट घेऊन ही अन्यायी कपात रद्द करण्यासाठी गोकुळच्या कार्यकारी संचालक आणि अध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची विनंती केली. शौमिका महाडिक यांनी या विनंतीला मान देत सभासदांना घेऊन थेट गोकुळचे प्रधान कार्यालय गाठले. मात्र अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासमवेत चर्चेला सुरुवात केली. दरम्यान आक्रमक झालेल्या सभासदांनी कार्यकारी संचालकांना चांगलेच धारेवर धरले. एका हाताने तुम्ही १३६ कोटींचे फरक बिल देता,त्याचा गाजावाजा करतात आणि दुसऱ्या हाताने त्यातील तब्बल 40% रक्कम कपात करता हा कुठला कारभार? असा सवाल करत सभासदांनी कार्यकारी संचालकांना घेराव घातला. संघाच्या पाचशे कोटींच्या ठेवी असल्याचा दावा करत असताना डिबेंचर पोटी दूध संकलन करणाऱ्या संस्थांचे पैसे कापून घेण्याचे प्रयोजन काय? अशी विचारणा सभासदांनी केली. गाईच्या दुधाला ज्यादा फरक आणि म्हशीच्या दुधाला कमी असा उलटा कारभार कशासाठी? मग दूध उत्पादकांनी कर्ज काढून म्हशी घेतल्या कशासाठी? अशा प्रश्नांचा भडीमार संतप्त सभासदांनी कार्यकारी संचालकांवर केला.
संस्थांना विश्वासात न घेता डिबेंचर कपात केलीच कशी? अशी विचारणा करत १० तारखेपर्यंत फरकाची रक्कम न मिळाल्यास गाई म्हशींसह गोकुळच्या दारात आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी बाळासाहेब नाईक, चंद्रशेखर गुरव, सांगाप्पा भुसुरी, संदीप चव्हाण, कृष्ण चव्हाण, महादेव कोरी, अमर पाटील, माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, हंबीरराव पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर,रवीश पाटील,प्रताप पाटील (कावणेकर), तानाजी पाटील, मकरंद बोराडे,देवराज बारदेस्कर, शिवाजी पाटील, सर्जेराव पाटील (बोणे),रावसाहेब चौगुले, सतिश चौगुले,रंगराव तोरस्कर, जोतिराम घोडके,ॲड सुभाष डोंगरे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
*या लढ्यात सभासदांसोबत – शौमिका महाडिक*
गोकुळ दूध संघाची आर्थिक परिस्थिती चांगली असताना संस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कापून घेण्यात आलेली डीबेंचरची रक्कम तात्काळ परत केली पाहिजे. सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला सणासुदीला आर्थिक फटका बसला तर भविष्यात संघही अडचणीत येईल. त्यामुळे या लढ्यात मी सभासदांसोबत आहे.१० तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास होणाऱ्या आंदोलनात मी सभासदांसोबत सहभागी होईन.
-शौमिका महाडिक, संचालिका गोकुळ