दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी ‘गोकुळ’चा निर्णायक पुढाकार
– नविद मुश्रीफ
चेअरमन, गोकुळ दूध संघ
गोकुळची दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक योजन सुरु
कोल्हापूर, ता.२७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांची दुधातील फॅट, एस.एन.एफ तपासणीचे जुने (मिल्को टेस्टर) मशीन कंपनीना बायबॅक (पुनर्खरेदी) करून नवीन दूध तपासणीचे अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेमधील सहभागी गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांना नवीन अॅनालायझर मशीनचे वाटप आज गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. यावेळी प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी व मिल्क अॅनालायझर कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाची ओळख ही दुधाच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे निर्माण झाली आहे. ही गुणवत्ता कायम राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गोकुळमार्फत सातत्याने केले जात आहे. दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेनुसार योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हाच गोकुळचा मुख्य उद्देश आहे. दूध संकलनाच्या वेळी फॅट व एसएमएफ तपासणी अचूक होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गोकुळच्या संलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थांनी दूध तपासणीसाठी आधुनिक आणि विश्वासार्ह यंत्रणा वापरणे गरजेचे आहे. अनेक संस्थांकडे आजही जुनी किंवा विना वापर पडलेली फॅट तपासणी व अॅनालायझर मशीन आहेत. अशा मशीनमुळे तपासणीत अचूकता येत नाही आणि पारदर्शकतेवरही परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीची दखल घेत, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने एकमताने जुनी व विना वापर मशीन संघामार्फत नेमलेल्या पुरवठादार कंपनीना बायबॅक करून त्याऐवजी नवीन, अत्याधुनिक अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक दूध संस्थांना नवीन मशीन खरेदी करताना तीन हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार असून, तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात येणार आहे. सन १९८२ साला पासून गोकुळचा मिल्को टेस्टर विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून दूध संस्थांची दूध तपासणी मशिनस् अधिक अचूक, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे. बायबॅक योजनेमुळे दूध तपासणीतील अचूकता वाढेल. गोकुळ दूध संघाची गुणवत्ता परंपरा आणखी मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल.”
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, दुग्ध व्यवसायामध्ये दूध तपासणी मशीन असो वा दूध काढणी मशीन, त्यांची स्वच्छता व नियमित देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. मशीनची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती करणे, दररोज स्वच्छ पाण्याने योग्य प्रकारे वॉशिंग करणे आवश्यक असून, त्यातूनच मशीन अधिक काळ टिकते तसेच दूध तपासणीत अचूकता मिळते. दूध संस्था कर्मचाऱ्यांनी वापरातील दूध तपासणी मशिन्सची नियमित देखभाल करण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या बायबॅक योजनेमुळे प्राथमिक दूध संस्थांना निश्चितच लाभ होईल.
या योजनेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात आली असून जास्तीत जास्त दूध संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मिल्कोटेस्टर विभागाचे प्रमुख बाजीराव मुडूकशिवाले, डॉ.एम.पी.पाटील, प्राथमिक दूध संस्थेचे प्रतिनिधी, मिल्क अॅनालायझर कंपनीचे प्रतिनिधी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
———————————————————————————————————-
फोटो ओळ: योजनेतील सहभागी दूध संस्थांना नवीन अॅनालायझर मशिनचे वाटप करताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, मिल्कोटेस्टर विभागाचे प्रमुख बाजीराव मुडूकशिवाले दूध संस्था प्रतिनिधी आदी दिसत आहेत.
———————————————————————————————————-



