*हिंदू धर्मात फुट पाडाल तर याद राखा, मी हिमालयासारखा उभा आहे : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी*
*लिंगायत हे हिंदूच, जाहीर शास्त्रार्थाला सिद्ध : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी*
विजयपूर : बसवादि शरण हिंदूच होते, महात्मा बसवेश्वर हिंदू दार्शनिक होते, मात्र अशा महापुरुषाला काही लोक नास्तिक ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, याला स्वामीजींनी कडाडून विरोध केला. त्याबाबत जाहीर शास्त्रार्थ करण्यास सिद्ध असल्याचे आव्हान सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूरचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी बबलेश्वर, विजयपुरा येथील जाहीर विराट बसवादि शरण हिंदू संमेलनात दिला.
यावेळी विराट समुदायाला संबोधित करताना स्वामीजी म्हणाले, “काही लोक महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा चुकीचा पद्धतीने अर्थ लावून सांगत आहेत. बसवादि जे संत आहेत ते सर्वही हिंदूच होते. त्यांनी प्रत्येकाने आपल्या वचनांच्या शेवटी म्हणजेच जे अंकितनाम म्हंटले जाते त्यामध्ये त्यांनी त्यांचे त्यांचे कुलदैवत, ग्रामदैवत यांचा उल्लेख केलेला आहे. त्या सर्व देवता हिंदूंच्या आराध्य देवता आहेत, त्यावरून ते हिंदूच होते हि दर्शित होते. काहीजण महात्मा बसवेश्वरांच्या काही वचनांचा उल्लेख करत बसवेश्वर हे मंदिर, मूर्तीपूजा, वेद, उपनिषद विरोधक होते असे चुकीचा समज तयार करत आहेत. तर महात्मा बसवेश्वरांनी रचलेल्या अनेको वचनांमध्ये हिंदू धर्मातील देवतांची स्तुती व समर्थन केलेले आहे. तसेच त्यांच्या अनेक वचनांमध्ये त्यांच्या मताच्या पुष्ट्यर्थ वेद व उपनिषद यांतील वाक्यांचे दाखले दिलेले आहेत हे हिंदू धर्म विरोधी लोक सांगत नाहीत.
जसे प्रत्येक घराला खिडकी दरवाजा असतात त्यातून धूळ आत येत असते, अशावेळी घर नेहमी स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य असते. तसे हिंदू धर्मात काही चुकीच्या गोष्ठी वेळोवेळी आल्या त्या त्या वेळी अनेक महात्मे येतात आणि त्या स्वच्छ करून जातात. तसे महात्मा बसवेश्वरांनी धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा काढून टाकून शुद्धीकरणाचे काम केले म्हणून एक शुद्धबुध्द हिंदू धर्म आपल्याला दिला.
महात्मा बसवेश्वर पुनर्जन्म व कर्मसिद्धांत मानत नाहीत, अशा प्रकारे त्यांच्याबद्दल दुष्प्रचार केला जात आहे. पण बसवेश्वरांच्या अनेक वचनांमध्ये पुनर्जन्म व पूर्वजन्म सिद्धांत हि मांडलेला आहे तसेच कर्मसिद्धांत व मोक्षसिद्धांत नमूद केला आहे. त्यांनी वेदांचा स्वीकार केलेला आहे. मात्र काही हिंदू धर्म विरोधी घटक महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा चुकीचा अर्थ काढून समाजाची दिशाभूल करून गोंधळ निर्माण करत आहेत. वीरशैव व लिंगायत असा भेद करून हि काही लोक लिंगायत समाजात हि फुट पडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हिंदू धर्मात हि फुट पडण्याचे षडयंत्र करत आहेत. आम्ही अगोदर हिंदू आहोत मग आम्ही वीरशैव, लिंगायत आहोत असे स्वामीजींनी ठणकावून सांगितले.
हिंदू धर्मावर कोणी आघात केला तर मी वज्रासारखा कठोर आहे हे विसरू नये. हिंदू धर्मात फुट पडण्याचा कोणी विचार केला तर याद राखा, मी हिमालयासारखा उभा असेन असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
कर्नाटक येथील विजयपूर येथील राजकीय दृष्ट्या प्रेरित प्रवेश बंदी उठवल्यानंतर बबलेश्वर, विजयपुर येथे आयोजित येथील जाहीर विराट बसवादि शरण हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी बोलत होते. यावेळी कर्नाटकातील बसव परंपरेचे अनेक संत, महात्मे, मठाधिपती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हजारो महिला-पुरुषांच्या उपस्थितीत बबलेश्वर येथील मुख्य चौक ते कार्यक्रमस्थळ अशी मोठी मिरावूक काढून स्वामीजींचे स्वागत करण्यत आले. यात हजारो कलशधारी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक ठिकाणी या मिरवणुकीवर व स्वामीजींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. भर उन्हात हि हजारो लोक या कार्यकम स्थळी उपस्थित होते.
*विशेष चौकट :*
*वीरशैव व लिंगायत एकच व हिदू धर्माचाच पंथ*
वीरशैव व लिंगायत एकच आहेत, वेगळे नाहीत व ते हिंदूच आहेत. जर काही मुठभर लोकांना नवीन लिंगायत धर्म निर्माण करायचा असेल तर त्यांनी हिंदू लिंगायत विचारांवर आधारित जुने मठ सोडून द्यावेत व नवीन मठ बांधावेत, भगवे वस्त्र सोडून नवे कपडे शोधावीत. सनातन आगम शास्त्रातून आलेले लिंग, भस्म, रुद्राक्ष आणि हिंदू धर्माचा भाग असलेल्या मंत्रजपाचा त्याग करून नवीन काही तरी शोधावे, अन्यथा हि धर्मविरोधी बाष्कळ बडबड थांबवावी, असा इशारा स्वतंत्र लिंगायत धर्म समर्थकांना स्वामीजींनी यावेळी दिला. तसेच हा धर्मविरोध थांबला नाही तर असे विराट बसवादि हिंदू धर्म संम्लेलन देशभरात आयोजित करणार असल्याचे पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सांगितले.
.



