सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी हे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.अस्मानी व सुल्तानी संकटात राज्य सरकारने तातडीने आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना अनुक्रमे ५ लाख व ३ लाख मदत जाहीर करावी अन्यथा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्यावतीने २३ मार्च रोजी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत बंद करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ओरोस (सिंधुदुर्ग ) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चामध्ये केली.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या मोर्चास भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाकडे मांडल्या असून मी स्वत : सर्व परिस्थितीची पाहणी केली असून ९० टक्के नुकसान झाले असल्याचे सांगितले. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री यांचेसोबत आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन अन्य मागण्या मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
बदलत्या हवामानामुळे तुडतुडे, फळमाशी तसेच विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलाचा आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून देवगड व इतर भागांमध्ये मोहोर करपल्यामुळे उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे राज्य व केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
यावेळी खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
1. आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी आणि अनुक्रमे हेक्टरी ५ लाख रुपये व हेक्टरी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.
2. खते, किटकनाशके व बुरशीनाशके पुरवणाऱ्या काही कंपन्यांकडून बोगस औषधे व खते मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस आणली गेल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत कृषी विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
3. देवगड येथे अद्ययावत आंबा संशोधन केंद्र स्थापन करून AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हवामान, रोगनियंत्रण व आधुनिक शेतीविषयक माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात यावे.
4. आंबा व काजू या पिकांना हमीभाव (Minimum Support Price – MSP) जाहीर करण्यात यावा. उसाप्रमाणेच या पिकांनाही किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळेल व बाजारातील चढ-उतारापासून त्यांचे संरक्षण होईल.
वरील मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या वतीने २३ मार्च रोजी मुंबई -गोवा महामार्ग रोखून बेमुदत बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरवात झाली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो आंबा व काजू बागायतदार या मोर्चेस सहभागी होते.







