कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर फर्स्टची दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांशी बैठक: रस्ते, रेल्वे, पर्यटन व क्रीडा प्रकल्पांवर चर्चा
कोल्हापूर : १४ मार्च: कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर फर्स्ट या संस्थेच्या शिष्टमंडळाने दिनांक ११ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्त्वाखाली सविस्तर चर्चा केली.
कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या पुढाकारातून कोल्हापूर फर्स्टचे पदाधिकारी मोहन कुशिरे, जयदीप पाटील, सतीश डकरे, मिलिंद आळवेकर, हरिश्चंद्र धोत्रे, पद्मसिंह पाटील, प्रताप कोंडेकर आदी सदस्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने विविध विकासात्मक विषयांवरील निवेदने संबंधित मंत्र्यांना सादर केली.
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन तावडे हॉटेल ते शिवाजी उड्डाणपूल प्रकल्प गतीमान करणे तसेच कोल्हापूर परिसरातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना वेग देण्याबाबत शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन सादर करून त्यावर चर्चा केली. कोल कोल्हापूर फर्स्टच्या वतीने तावडे हॉटेल ते शिवाजी उड्डाणपूल प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच कोल्हापूर सातारा – रत्नागिरी आणि मिरज या प्रमुख मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार पद्धतीने आणि जलद गतीने पूर्ण करण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पास तातडीने गती देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आले आणि या प्रकल्पाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या भागांना जलद, थेट आणि पर्यावरणपूरक संपर्क मिळणार असून पर्यटन, व्यापार, बंदर विकास, उद्योग तसेच एकूण सामाजिक-आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळेल, असे शिष्टमंडळाने नमूद केले. या प्रकल्पाचे सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. राज्य सरकारचे सहकार्य मिळाल्यास रेल्वे मंत्रालयाकडूनही या प्रकल्पास गती देण्याची तयारी असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमाला गती देण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. यासंदर्भात कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पावर पुढील कार्यवाहीसाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन ‘कोल्हापूर सातारा कोकण पर्यटन सर्किट” विकसित करण्याचा प्रस्ताव मांडत शिष्टमंडळाने त्यासंदर्भातील निवेदन सादर केले व या संकल्पनेवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र व कोकण प्रदेश हा ऐतिहासिक गड-किल्ले, समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्राचीन धार्मिक स्थळे तसेच सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण किनारपट्टीच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रदेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुमारे १५० किलोमीटरच्या परिसरात इतका विविधतापूर्ण भौगोलिक व सांस्कृतिक विस्तार आढळणारे क्षेत्र देशात दुर्मिळ असल्याचेही नमूद करण्यात आले. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर यांसारखी धार्मिक स्थळे, परिसरातील ज्योतिर्लिंग क्षेत्रे, ऐतिहासिक दुर्ग-किल्ले, सह्याद्री पर्वतरांगांचे नैसर्गिक सौंदर्य तसेच कोकण किनारपट्टीवरील पर्यटन आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा यांचा
समन्वित विकास करता येईल, असे नमूद करण्यात आले. मंत्री महोदयांनी १ एप्रिलपासून जाहीर होणाऱ्या नवीन पर्यटन धोरणामध्ये कोल्हापूर परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा कार्य व क्रीडा मंत्री श्री. मनसुख मांडविया यांच्याशी झालेल्या चर्चेत कोल्हापूर येथील ईएसआयसी रुग्णालयाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविणे तसेच ईएसआयसीमार्फत कोल्हापूर येथे वैद्यकीय महाविद्यालय करण्यासंदर्भातील मुद्दे मांडत शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आणि त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री म्हणून ईएसआयसी रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका दर्शवली. कोल्हापूर येथील ईएसआयसी रुग्णालय २०० बेडचे करण्याबाबत विशेष लक्ष देत या संदर्भात खासदारांसमवेत विशेष बैठक आयोजित करण्याचे आदेश त्यांनी दिले. ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास कामगारांच्या मुलांसाठी सुमारे ४५ टक्के प्रवेश राखीव असण्याची तरतूद असल्यामुळे या प्रदेशातील कामगार कुटुंबांना मोठा लाभ होईल, असे यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच कोल्हापूरमधील क्रीडा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने स्थानिक क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर कोल्हापूरमध्ये खेलो इंडिया योजना अंतर्गत आधुनिक क्रीडा संकुल / स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीसंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील समृद्ध क्रीडा परंपरा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू तसेच आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याची गरज याबाबत यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याची समृद्ध क्रीडा परंपरा आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर येथील खेळाडूंनी मिळविलेली पदके याबाबत माहिती देत जिल्ह्यात आधुनिक व केंद्रीकृत क्रीडा सुविधा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर फर्स्ट शिष्टमंडळाची ओळख करून देताना ही संस्था कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील १८ संस्थांच्या सहभागातून स्थापन करण्यात आली असल्याची माहिती दिली. त्यावर सर्व मंत्री महोदयांनी या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले. तसेच दिल्ली येथे झालेल्या या सर्व बैठकींचे नियोजन आणि समन्वय केल्याबद्दल कोल्हापूर फर्स्टच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
दिल्ली दौऱ्यादरम्यान खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबतही बैठक आयोजित करून विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी सांगितले की, दिल्ली येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटींनंतर मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर तसेच अन्य विकासात्मक मुद्द्यांवर कोल्हापूर फर्स्टच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, सतीश डकरे, मिलिंद आळवेकर, प्रताप कोंडेकर, केईएचे कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, मॅकचे मोहन कुशिरे, सतीश घाटगे, हरिश्चंद्र धोत्रे, बळीराम वराडे, अमर सासणे, राहुल पाटील
आदी उपस्थित होते.







