31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा – आयुक्त के.मंजूलक्ष्मी

Spread the news

31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा  आयुक्त के.मंजूलक्ष्मी

­

 

नगररचनाघरफाळापाणीपुरवठाइस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा घेतला आढावा

  •  

कोल्हापूर, ता. 17 : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आज आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत संबंधित सर्व विभागांनी येत्या दहा दिवसांत १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

            महापालिकेच्यावतीने आजअखेर एकूण ५०१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये नगररचना विभागाने ७० कोटी रुपयांची वसुली केली असून उर्वरित रक्कम ३१ मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरफाळा विभागाकडून ६० कोटी ८० लाख रुपये जमा झाले असून मागील वर्षापेक्षा अधिक वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाने ४२ कोटींची वसुली केली असून थकबाकी व शासकीय येणे येत्या दहा दिवसांत वसुल करण्यास सांगितले आहे. परवाना विभागाने २ कोटी ९८ लाख रुपये वसुल केले असून इस्टेट विभागाची वसुली कमी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

            यावेळी वर्कशॉप विभागातील वाहनांचाही आढावा घेण्यात आला. बंद असलेले जेसीबी तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देऊन १६ ट्रॅक्टर-ट्रॉली खरेदी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. टिप्पर दुरुस्ती एकाच कंपनीकडे न देता इतर सब-डिलरकडेही देण्याबाबत तपासणी करण्यास सांगण्यात आले. मुदत संपलेली वाहने स्क्रॅप करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

            शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व दुरुस्तीबाबतही आयुक्तांनी कडक निर्देश दिले. प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियमित फिरती करून तपासणी करावी, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तेथे टँकरद्वारे पुरवठा करावा तसेच आवश्यक दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर करावे, असे सांगण्यात आले. स्वच्छतेवर विशेष भर देत आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. सकाळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, दुपारी २ पर्यंत प्रत्यक्ष काम सुरू आहे का याची अचानक तपासणी करावी तसेच वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी निलंबन करण्याचे निर्देश देण्यात आले.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा-आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्री, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, पाणी पट्टी अधिक्षक प्रशांत पंडत, परवाना अधिक्षक अशोक यादव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य अग्शिनशमन अधिकारी मनिष रणभिसे, सहा.अभियंता विद्युत अमित दळवी व इतर अधिकारी होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!