- निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथी सुध्दा सक्षम पर्याय
डॉ. धर्मेंद्र शर्मा
कोल्हापूरः निरोगी आरोग्यासाठी दुष्परिणाम विरहीत होमिओपॅथी औषध प्रणाली देखील सक्षम पर्याय होऊ शक्ते असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे येथील होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धर्मेंद्र शर्मा यांनी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) ने आयोजित केलेल्या ‘होमेसाकॉन २०२६ या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केले. परिषद होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, ताराराणी चौक वोल्हापूरच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. “निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य होमिओपॅथीसह” या संकल्पनेवर आधारीत परिषदचे औपचारिक उद्घाटन डॉ. धर्मेंद्र शर्मा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य “निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य” सत्यात उतरवायचे असल्यास आपल्या देशामध्ये सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीच्या अंर्तभाव प्रभावीपणे करावा लागेल. शासनाच्या प्राथमिक आरोग्यसेवेपासूनच जर होमिओपॅथीचा अंतर्भाव केल्यास दैनंदिन बाहय रूग्ण विभागातील रुग्णांना अल्प खर्चामध्ये उपचारांचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल.
पारंपारिक उपचार पध्दतीनंतर होमिओपॅथीचाच वापर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असून भारत होमिओपॅथी चे जागतिक नेतृत्व करत आहे. होमिओपॅथीचा सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये पारंपारिक उपचार पध्दती सोबत अंर्तभाव केल्यास सार्वजनिक आरोग्य सेवा जलद गतीने कार्यान्वित होऊन समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहचेल व होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक वैद्यकिय व्यवस्था निर्माण होईल असेही डॉ. शर्मा म्हणाले,
” कृत्रिम बुध्दीमत्ता आणि होमिओपॅथी” याबाबत बोलताना डॉ. शर्मा म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्ता डिजीटल हेल्थ, टेलीमेडीसीन च्या वापरामुळे रुग्णांच्या लक्षणांचे विश्लेषण कमी वेळेत होऊन रोगांचे अचूक निदान करणे सोपे झाले आहे. याशिवाय रूग्णांच्या नोंदी व्यवस्थित लावणे, साहित्य शोधणे, रेपरटरी
हाताळणे इ. सारख्या कामांमध्ये होमिओपॅथस् ना मदत होते. नव्या तंत्रज्ञानामुळे निदान आणि उपचार पध्दती अगदी अचूक आणि परिणामकारक होत आहेत.
डॉ. राहुल जोशी (मुंबई) यांनी “तात्काळ उद्भवणाऱ्या आजारासाठी होमिओपॅथिची आवश्यक्ता” या विषयावर बोलताना होमिओपॅथी औषधप्रणाली नुसार रुग्णांची माहिती कशा प्रकारे घ्यावीयाचे सविस्तर मार्ग दर्शन केले, त्यांनी दैनंदिन किंवा सतत उद्भवणाऱ्या आजारापासून ते दीर्घमुदतीच्या आजारावरती अद्ययावत होमिओपॅथीक उपचारा संबंधी विवेचन केले.
शासकिय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल चे प्रभारी प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा “राष्ट्रीय वैद्यकीय व्यवसाय पुर्वपरिक्षा” या विषयावर मागदर्शन केले.
डॉ. प्रशांत तांबोळी (मुंबई) यांनी “सार्वत्रिक आरोग्य सेवेत होमिओपॅथिचा संशोधन विकास” तर डॉ. संतोष रानडे यांनी “बालकांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथी” याविषयावर मार्गदर्शन केले.
प्रारंभी होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून असोसिएशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. परिषदेच्या संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी “निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य होमिओपॅथीसह” या परिषदेच्या संकल्पनेबाबत सविस्तर भाष्य केले. सचिव डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले..
परिषद यशस्वी होणेसाठी डॉ. उदय पुराणिक, डॉ. सादिक मुकादम, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. महावीर वसवाजे, डॉ. जितेंद्र वीर, डॉ. बदिन मणेर, डॉ. सचिन मगदुम डॉ. महेश पटेल, डॉ. दिपक लडगे इ. नी. विशेष परिश्रम घेतले. परिषदेस सुमारे ४०० होमिओपॅथ्स उपस्थित होते.