विवेकानंद महाविद्यालय तर्फे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय हॉकी पुरुष स्पर्धेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग नोंदवला आहे.
उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा समृद्ध वारसा जपणाऱ्या या ऐतिहासिक क्रीडानगरीत हॉकीच्या पारंपरिक संस्कृतीला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी जोड मिळाली आहे. नवे ॲस्ट्रोटर्फ मैदान, शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत ऑलिंपिकपर्यंत नक्कीच मजल मारतील.” जुना वारसा आणि आधुनिक पद्धतींचा हा संगम नव्या पिढीतील खेळाडूंसाठी यशाची नवी दालने खुली करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, हे ॲस्ट्रोटर्फ मैदान उभारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे सरदार यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. विकास जाधव काम पाहत असून, सदस्य म्हणून रणजीत इंगवले आणि संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून सागर जाधव, योगेश देशपांडे, संतोष चौगुले, सागर पोवाळकर, रमा पोतनीस, गणेश पाटील, ओंकार भांडवले, राहुल गावडे आणि राम पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास जाधव यांनी2 केले. पाहुण्यांची ओळख प्रा. समीर पठाण यांनी करून दिली, तर प्रा. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रशासकीय सेवक सुरेश चारपाले यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विविध महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



