केदार शिंदे लवकरच घेऊन येत आहेत ‘गणा धाव रे’ श्रद्धा आणि मानवी नात्यांची कथा

Spread the news

केदार शिंदे लवकरच घेऊन येत आहेत ‘गणा धाव रे’ श्रद्धा आणि मानवी नात्यांची कथा

­

 

कोल्हापूर:
‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ निर्मित ‘गणा धाव रे’ हा मराठी चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरज सिंग , वर्षा कुकरेजा , चैतन्य प्रवीण राणे आणि रिचर्ड पीटर्स यांच्या निर्मितीत, साकारला जाणारा हा चित्रपट आशयघन आणि वैविध्यपूर्ण कथाकथनासाठी ओळखल्या जाणाऱ्या टीमकडून पुन्हा एकदा वेगळा आणि अर्थपूर्ण विषय घेऊन येत आहे. दोन दशकांहून अधिक अनुभव असलेले सूरज सिंग यांनी यापूर्वी विविध यशस्वी चित्रप्रकल्पांमध्ये काम केले असून, त्या अनुभवाची छाप या चित्रपटातही उमटणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि प्रभावी कथनशैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक केदार शिंदे करत आहेत. प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या कथा सादर करण्यात प्रवीण असलेल्या शिंदे यांनी या वेळी श्रद्धा आणि अध्यात्माशी निगडित विषय हाताळला आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, “हा विषय माझ्यासाठी केवळ कथा नसून, माझ्या श्रद्धेशी आणि भावविश्वाशी जोडलेला आहे. सहसा आपण कथा निवडतो; मात्र या वेळी या कथेनेच मला निवडले,” असे त्यांनी नमूद केले.
कोकणातील पार्श्वभूमीवर उलगडणारा ‘गणा धाव रे’ हा एक आध्यात्मिक आणि नाट्यमय चित्रपट असून, दंतकथा, भक्ती आणि माणुसकी यांच्या भावविश्वात गुंफलेली कथा यात पाहायला मिळणार आहे. एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेभोवती फिरणारी ही कथा, त्या श्रद्धेची ताकद, तिचा प्रभाव आणि तिच्यामागील भावनिक प्रवास यांचा वेध घेते. गणपती बाप्पांवरील नितांत श्रद्धा, गावकुसातील परंपरा आणि सामूहिक भावविश्व यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात येणार आहे.
कल्पनारंजन आणि वास्तव यांचा सुरेख मेळ साधत, एका भक्त आणि दैवतामधील नात्याचा सूक्ष्म आणि भावपूर्ण शोध या कथेतून घेण्यात आला आहे. कोकणातील सण-उत्सव, परंपरा आणि स्थानिक जीवनपद्धती यांची मांडणी चित्रपटाला अधिक समृद्ध बनवते. भावनिक पातळीवर प्रेक्षकांना जोडणारी आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी अशी ही कथा असल्याचे दिसून येते.
‘गणा धाव रे’ हा केवळ एक चित्रपट नसून, श्रद्धा, विश्वास आणि माणुसकी यांच्यातील नात्याचा एक अर्थपूर्ण प्रवास ठरणार आहे. प्रभावी आशय, सांस्कृतिक मांडणी आणि भावनिक गाभा यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!