आवळी बुद्रुकच्या आकांक्षा पाटील चे MPSC परीक्षेत कर साहाय्यक व महसूल साहाय्यक असे दुहेरी यश
आवळी बुद्रुक ता.राधानगरी येथील आकांक्षा बळवंत पाटील या सर्वसामान्य कुटुंबातील कन्येने MPSC परीक्षेतून एकाच वेळी कर साहाय्यक व महसूल साहाय्यक या दोन पदांना गवसणी घातली आहे.
तिचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालय,कोल्हापूर येथे झाले.पद्माराजे हायस्कूल, कोल्हापूर मधून इ.5वी उत्तीर्ण झाल्यानंतर तिची इ. 6वी साठी जवाहर नवोदय विद्यालय,कागल येथे निवड झाली.पुनश्च: पद्माराजे हायस्कूल या ठिकाणी तिने आपले इ. 9वी व 10वीचे शिक्षण पूर्ण केले.SSC परीक्षेमध्ये 93 % गुण मिळवले तर न्यू कॉलेज,कोल्हापूर मधून HSC परीक्षेत विज्ञान शाखेत 75 % गुण मिळवले.नेहमीच तिची यशाची चढती कमान राहिली.
स्पर्धा परीक्षेचे ध्येय उराशी बाळगून न्यू कॉलेजमध्ये तिने बी.ए.ला प्रवेश घेतला.बी.ए.करत असतानाच शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदरत्न स्पर्धेमध्ये ती सहभागी झाली.विद्यापीठातून निवड होऊन दिल्लीच्या केंद्रीय संसद भवनातील स्पर्धेत सहभागी होण्याचा मान तिने पटकावला.या स्पर्धेत फक्त ती सहभागी झाली नाही तर दिल्लीमध्ये या स्पर्धेद्वारे युवा संसदरत्न पुरस्कार पटकावण्याचा सन्मान तिने मिळवला.
याच कालावधीत आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या काही कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत राज्यशास्त्र विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली.
अखेर तिच्या मेहनतीला यश येऊन कर साहाय्यक व महसूल साहाय्यक अशा दोन्ही पदांसाठी MPSC द्वारे तिची निवड झाली. तिच्या यशामध्ये तिचे आईवडिल, नातेवाईक व शिक्षक यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने घेतलेल्या या गगनभरारीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक होत असून,तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…




