ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा–अमरसिंह घोरपडे
कागल (प्रतिनिधी) – ऊस उत्पादनात होत असलेली घट लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे,असे आवाहन श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले.
येथील डीकेएम भवनमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ आणि स्पीक लि. ग्रीनस्टार फर्टीलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
घोरपडे म्हणाले की, ऊस उत्पादन दिवसेंदिवस घटत असून ही बाब चिंतेची आहे. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना निरोगी ऊस रोपे, दर्जेदार खते व औषधांचा पुरवठा केला जात आहे. तसेच विविध उपक्रम राबवून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
या मेळाव्यात ग्रीनस्टार फर्टीलायझर्सचे प्रादेशिक व्यवस्थापक बसवराज मल्लासुरे, प्रवीण ऐनावले तसेच ‘शाहू’चे शेती अधिकारी दिलीप जाधव यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ‘शाहू’चे संचालक युवराज पाटील, डॉ. डी.एस. पाटील, सचिन मगदूम, सतीश पाटील, संजय नरके, भाऊसाहेब कांबळे, शाहू कृषीचे उपाध्यक्ष सुदर्शन मजले यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक सदानंद घोरपडे व शाहू समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रेयस साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील यांनी आभार मानले




