ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुबाडाल तर खबरदार
खुद तोड खुद वाहतूक करून ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे टणाला 105 रुपये दत्त साखर कारखान्याकडून वसुल केले : धनाजी चुडमुंगे
426 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति टन 105 रुपये प्रमाणे रक्कम जमा
गत हंगामात भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस खुद तोड खुद वाहतूक करून दत्त साखर कारखान्यास ऊस घातला होता.
शासनाच्या नियमाने ज्या शेतकऱ्यांनी खुद तोड खुद वाहतूक करून ऊस आणून दिला जातो अशा शेतकऱ्यांना ढोबळ एफ आर पी द्यावी लागते.
दत्त साखर कारखाण्याची 4255 रुपये ढोबळ एफ आर पी होते पण कारखाण्याने उसाचे बिल म्हणून 3450 रुपये दिले आणि तोडणी वाहतूक खर्च म्हणून 700 रुपये अशी दोन स्वतंत्र बिले काढली होती. दोन बिले मिळून एकूण 4150 रुपयेच दिले होते.
शिरोळ मधील काही शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर त्यांनी साखर सह संचालक कोल्हापूर यांच्याकडे अपील दाखल केले.
कोल्हापूर साखर संचालक कार्यालयात याप्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली असता कारखाण्याने नेहमीच्या सवयीनुसार ढोबळ एफ आर पी पेक्षा शेतकऱ्यांना जादा रक्कम दिल्याचा खोटा अहवाल साखर सह संचालकांना दिला होता त्याला आम्ही पुराव्यासह उघडे पाडल्यावर दत्त कारखाण्याने लेखी माफी मागून उर्वरित पैसे लवकरच देतो असे सांगितले होते. कारखाण्याच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता साखर सह संचालकांनी पैसे द्यावेत म्हणून 7 मे 2026 रोजी लेखी आदेश दिले होते.
त्या आदेशानुसार काल दिनांक 19 मे 2026 रोजी 400 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन 105 रुपये प्रमाणे पैसे जमा झाले आहेत.
आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रामाणिक आणि सततच्या पाठपुराव्यामुळे कारखाण्याने शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे लुबाडले होते ते वसुल करून शेतकऱ्यांना मिळवून दिले. यापुढे शेतकऱ्यांना लुबाडण्याचा उद्योग कारखान्यांनी करू नये शेतकऱ्यांच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत याची जाणीव कारखानदारानी ठेवावी.
हा निर्णय दत्त कारखाण्याला नव्हे तर सगळ्याच कारखान्यांना लागू असून अन्य कारखान्यांना ज्या शेतकऱ्यांनी खुद तोड खुद वाहतूक करून ऊस घातला आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेले ऊस बिल ढोबळ एफ आर पी नुसार आहे काय याची खातरजमा करून घ्यावी असे आवाहन आहे.
——————————————-
कारखाने सरासरी तोडणी वाहतुकीच्या नावाखाली जवळच्या शेतकऱ्यांकडून जादा तोडणी वाहतूक लावतात म्हणून किंवा ऊस लवकर घालवण्यासाठी स्वता ऊस तोडून कारखान्यात ऊस पोहोचवत असतात. त्यामागे चार पैसे जादा मिळतील ही अपेक्षा असते पण कारखाने त्यातही अपेक्षा ठेऊन त्यांना लुबाडतात. शेतकऱ्यांना कायद्याने आपल्याला काय अधिकार आहेत हेच माहिती नसल्याने त्यांना आपली फसवणूक झाली आहे याची कल्पना नसते. पण आम्हा चळवळीतील कार्यकर्त्यांना याची पूर्ण माहिती असल्यामुळे आम्ही दोन तीन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन निस्वार्थीपणे 426 शेतकऱ्यांना याचा टणाला 105 रुपये फायदा करून दिला आहे.





