इयत्ता पाचवीपासूनच आयटी साक्षरतेसाठी रयत आग्रही : उपाध्यक्ष डॉ. एम. बी. शेख
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्राने समाज आणि उद्योगविश्वाशी सातत्याने संलग्न राहून काळानुसार लवचिकतेने बदल स्वीकारणे ही आजची गरज असून, विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासूनच आयटी साक्षर करण्यासाठी रयत शिक्षण संस्था विविध उपक्रमांतून कृतीशीलपणे कार्यरत आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले उद्योजक डॉ. एम. बी. शेख यांनी केले.
हितचिंतक -मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शेख म्हणाले, “आधुनिकतेचा ध्यास घेत असतानाच बहुजन समाजाच्या गरजांप्रती सजग राहून रयत शिक्षण संस्था कार्यरत आहे. आदरणीय शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. स्वर्गीय यशवंत राव चव्हाण – प्रा . एन डी पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठांच्या विचारांचा वसा आणि वारसा रयत शिक्षण संस्था व शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी उद्योगविश्वाचे सहकार्य घेण्यावर आम्ही भर देणार आहोत.”
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल विद्यापीठाचे डॉ .टी. एस. पाटील, उद्योजक शंकर पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, आकाशवाणीचे श्रीपाद काळेकर, श्रीमती सरोज ताई एन. डी. पाटील, ‘अविष्कार’चे संजय पवार, ‘आसमा’चे कौस्तुभ नायर आदी मान्यवरांनी डॉ. शेख यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व बहुजन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या उपक्रमांचे कौतुक केले.





